डी.जी.बांदेकर आर्ट अँड क्राफ्ट कार्यशाळा उत्साहात…

⚡सावंतवाडी,ता.२३-: डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी यांच्या वतीने दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्ट अँड क्राफ्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ६ वर्षांवरील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून चित्रकला, क्राफ्ट व विविध सर्जनशील उपक्रमांमधून आपली कल्पकता व्यक्त केली.

या उपक्रमासाठी बी. एस. बांदेकर फाईन आर्ट (उपयोजित कला) महाविद्यालय, सावंतवाडी तसेच डी.जी.बांदेकर ट्रस्ट, फाउंडेशन कोर्स चे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास श्री. तुकाराम मोरजकर (विभागप्रमुख), श्री. धनंजय परब (व्याख्याते) व श्री. सुभाष राव (Lab incharge) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी कौस्तुभ सरसकर, ओंकार बागवे, मिहीत पिंगळे, श्रेष्ठा सिंग ठाकूर, रितेश पुरी, अनीश कमलाकर, अविष्कार शिंदे, पूर्वा चांदरकर व सान्वी गावंकर यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून कार्यशाळा यशस्वी करण्यास सहकार्य केले.

✨ विशेष आकर्षण :

कार्यशाळेतील विशेष आकर्षण म्हणून स्टॉप मोशन क्ले अॉनिमेशन या तंत्राचे विद्यार्थ्यांनी मुलांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. या माध्यमातून अॅनिमेशन कसे तयार केले जाते, फ्रेम-बाय-फ्रेम हालचालींची रचना कशी केली जाते याची माहिती मुलांना देण्यात आली. या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल व सर्जनशीलतेची नवीन दृष्टी निर्माण झाली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. गोविंद बांदेकर व सचिव अॅड. अनुराधा बांदेकर यांनी सर्व मार्गदर्शक, विद्यार्थी व सहभागी यांचे विशेष आभार मानले.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास व कलात्मक कौशल्यांचा विकास झाला. कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.

You cannot copy content of this page