अवकाळी पावसामुळे आंबा-काजू बागांचे मोठे नुकसान…

आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड तालुका आंबा उत्पादक शेतकरी संघ व व्यापारी संघाची शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी..

⚡देवगड ता.२२-: मागील १०० वर्षांत न अनुभवलेले भीषण स्वरूपाचे अवकाळी पावसाचे संकट कोकणात ओढवले असून आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ, देवगड तालुका आंबा उत्पादक संघ व शेतकरी व्यापारी संघाने श्री. नितेश राणे (पालकमंत्री, सिंधुदुर्ग तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री, महाराष्ट्र शासन) यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
संघाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) म्हणून या नुकसानीची दखल घेऊन शासनाने तत्काळ पंचनामे करावेत. आंबा-काजू बागांचे हेक्टरमागे किमान ५,००,००० रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज तातडीने माफ करावे आणि ३० जूनपर्यंत कर्जफेडीची मुदतवाढ द्यावी. बँका, सहकारी संस्था व खासगी कर्जदात्यांकडील कर्ज वसुली तात्पुरती स्थगित ठेवण्याचे निर्देश शासनाने द्यावेत, असेही निवेदनात नमूद आहे.
शेतकऱ्यांना NDRF मधून मदत देण्यात यावी. देवगड येथे ICAR मार्फत National Research Centre for Mango कार्यान्वित करून आंबा संशोधन व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. कीड-रोग नियंत्रणासाठी आवश्यक औषधे व कृषी निविष्ठा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यावरील GST माफ करावा.
सध्या कृषी विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या sampling ची मर्यादा २० टक्क्यांवरून वाढवून किमान ५० टक्के करावी. तसेच पीककर्जावरील व्याजदर कमी करून interest subvention ही योजना ३,००,००० रुपयांवरून ,6००,००० सहा लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय आंबा निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना Farmer ID, इ- पिक पाहणी ,पोट खराबा व इतर नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर कराव्यात, अशीही मागणी संघाने केली आहे.
अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page