निर्मला सामंत प्रभावळकर यांचे गौरवोद्गार..
⚡सावंतवाडी दि.२२-: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व सेवाभावी कार्य करणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विविध मान्यवरांकडून संस्थेच्या कार्याची दखल घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्या तथा माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल विशेष गौरवोद्गार काढले आहेत.
त्या म्हणाल्या, “सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही जे काम करता त्याला तोड नाही. तुमच्याकडे माणुसकी, धैर्य, सामर्थ्य आणि प्रचंड इच्छाशक्ती आहे. समाजासाठी खूप काही करण्याची जिद्द तुमच्यात आहे. हे कार्य अत्यंत खडतर असून, ते देव तुमच्या हातून करून घेत आहे असे मला मनापासून वाटते.”
सामाजिक कार्याबाबत सर्वसामान्यांची मानसिकता ‘कोणी तरी करेल’ अशी असते; मात्र ‘कोणी तरी’ पेक्षा ‘आपणच का नाही?’ असा विचार केवळ दहा टक्के लोकांनी जरी केला, तरी समाजात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
प्रसिद्धीपासून दूर राहून निस्वार्थी भावनेने सेवा देणे ही संस्थेची विशेष बाब असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, “माझ्याकडून कोणतीही मदत आवश्यक असल्यास जरूर कळवा,” असे आश्वासनही त्यांनी दिले.सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमांना अशा मान्यवरांकडून मिळणारे प्रोत्साहन संस्थेच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
