वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कारावर जिल्ह्याची मोहोर…

डॉ श्रीपाद पाटील, डॉ सई धुरी यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांचा उद्या होणार सन्मान..

⚡ओरोस ता २१-: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह,मुंबई येथे संपन्न होणार आहे. या मानाच्या पुरस्कारांचे वितरण सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने विविध श्रेणींमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
२०२५-२६ या कालावधीत कॅन्सर तपासणी मोहिम अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याने सिव्हिल सर्जन स्तरावर राज्यात द्वितीय क्रमांक,
जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या उल्लेखनीय
व उत्कृष्ट कामगिरी बद्दल सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाला आहे. तसेच डॉ. प्रकाश पाटोडेकर यांना ग्रामीण रुग्णालय स्तरावरील रँकिंग मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे व देवगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ आशिष ओहोड यांना प्राथमिक आरोग्य केंद्र रँकिंग अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर आशा सेविका सौ. समीक्षा संतोष जठार (वैभववाडी, कोकिसरे) यांना उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय आशा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळा हा आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट, नाविन्यपूर्ण व समर्पित कार्याबद्दल दिला जाणारा मानाचा सन्मान असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या यशामुळे जिल्ह्याची राज्यस्तरीय प्रतिमा अधिक भक्कम झाली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

फोटो: डॉ श्रीपाद पाटील, डॉ सई धुरी

You cannot copy content of this page