दिवाणी न्यायालय कणकवली येथे मध्यस्थी जागृती कार्यक्रमांतर्गत कायदेविषयक शिबिराचे यशस्वी आयोजन ..

कणकवली : दिवाणी न्यायालय कणकवली येथे मध्यस्थी जागृती कार्यक्रम २०२५ -२६ अंतर्गत दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी “Meditation Action Plan” च्या अनुषंगाने प्रेरणादायी व समाजोपयोगी कायदेविषयक शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश शुभम गोविंद लटूरिया यांनी भूषविले.

न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांना पर्यायी, जलद व सौहार्दपूर्ण तोडगा देणारी मध्यस्थी ही संकल्पना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुभम लटूरिया यांच्या संयत, लोकाभिमुख व संवेदनशील मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला सकारात्मक दिशा लाभली. न्यायप्रक्रियेत मानवी दृष्टिकोनाला महत्त्व देणारी मध्यस्थी ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून सामाजिक सलोख्याचे प्रभावी साधन आहे, हा संदेश त्यांच्या अध्यक्षीय उपस्थितीतून अधोरेखित झाला.

या शिबिरात ज्येष्ठ वकील विलास परब यांनी “मध्यस्थीचे फायदे व मध्यस्थी ही काळाची गरज” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. न्यायालयीन ताणतणाव कमी करण्यासाठी, वेळ व खर्चाची बचत करण्यासाठी तसेच वादविवादाऐवजी संवादावर भर देण्यासाठी मध्यस्थीचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे मांडले. वकील निकिता म्हापणकर यांनी “Legal Principles of Mediation” या विषयावर मार्गदर्शन करताना मध्यस्थीची कायदेशीर तत्त्वे, संकल्पना व प्रत्यक्ष अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील मिलिंद सावंत यांनी अभ्यासपूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने केले. त्यांच्या सुयोग्य सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम प्रवाही व रसपूर्ण झाला.

या प्रसंगी सरकारी वकील श्री. उल्हाळकर, न्यायालयाचे सहायक अधीक्षक सौ. परब, सहायक अधीक्षक सौ. सावंत, वरिष्ठ लिपिक सौ. आचार्य यांच्यासह वकील, न्यायालयीन कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती लाभली. उपस्थितांनी शिबिरातील मार्गदर्शनाचे स्वागत करत अशा उपक्रमांमुळे न्यायव्यवस्थेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली.

दिवाणी न्यायालय कणकवली येथे शुभम लटूरिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कायदेविषयक शिबिराने न्यायालय व समाज यांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ केले असून, मध्यस्थी संस्कृती रुजविण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी व आदर्शवत ठरला आहे.

You cannot copy content of this page