⚡शिरवल दि.२१-: “आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीनुसार निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाने शारीरिक व मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरणा देते, असे प्रतिपादन शिरवलचे उपसरपंच प्रवीण तांबे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली यांच्या वतीने उपकेंद्र शिरवल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हिंद दी-चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बोलताना प्रवीण तांबे म्हणाले की, कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शिरवल उपकेंद्राच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणारा सेवाभावी प्रयत्न आहे.
यावेळी कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल परब यांनी नियमित आरोग्य तपासणी, सकस आहार व व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.
शिबिरात आरोग्य सहाय्यक गंगाधर पाटील, स्टाफ नर्स (एनसीडी) दीप्ती मोंडकर, आरोग्य सहाय्यक एस. व्ही. जाधव, आरोग्य सेवक डी. बी. सुर्वे, माजी ग्रामपंचायत सदस्य अजित सावंत, आरोग्य सेविका रश्मी सोहनी, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रिती सावंत व सौ. चैताली पांचाळ, डाटा ऑपरेटर राजेंद्र सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी सखाराम उर्फ बाबू गुरव, आशा सेविका मेघना पांचाळ, मदतनीस अनिता घाडीगावकर आदी उपस्थित होते.
या शिबिरात डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने लाभार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच असंसर्गजन्य रोगांची (एनसीडी) तपासणी करून आवश्यक उपचार देण्यात आले. तसेच आयुष्मान भारत योजना अंतर्गत पीएमजेएवाय कार्ड नोंदणी करण्यात आली. काही लाभार्थ्यांची ईसीजी तपासणीही करण्यात आली. शिरवल गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरासाठी सरपंच गौरी वंजारे, प्रवीण तांबे व ग्रामपंचायत शिरवल यांचे सहकार्य लाभले.
