⚡मालवण ता.१९-:
शिवजयंती निमित्त सिंधुदुर्ग किल्ला येथे फिरण्यासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा. रत्नागिरी) या दहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
रत्नागिरी येथून विद्यार्थी व पालकांचा २५ ते ३० जणांचा समूह आज सकाळी शिवजयंती निमित्ताने मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. या समूहामध्ये अस्मी गोविलकर ही शाळकरी मुलगी आपल्या आईसमवेत सहभागी झाली होती. किल्ल्यावर भर उन्हात फिरत असताना तिला चक्कर येऊन ती जमिनीवर कोसळली. तिच्यासमवेत आलेल्या पालकांनी तिला तात्काळ होडीने मालवण येथे आणत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अस्मीच्या अकाली मृत्यूमुळे तिची आई मोहिनी गोविलकर यांना मोठा धक्का बसला आहे. अस्मीला लहानपणापासून हृदयाचा आजार असल्याची माहिती तिच्या आईने वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहीती मिळताच मालवणच्या पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा खोत व पोलीस कॉन्सटेबल जनार्दन रेवंडकर यांनी रूग्णालयात धाव घेत पुढील कार्यवाही हाती घेतली. दरम्यान या घटनेची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
