कुणकेश्वरच्या पवित्र भूमीत उलगडला शिवकालीन इतिहासाचा दडलेला ठेवा…

छत्रपती शिवरायांचे अमात्य नारोपंत नीलकंठ यांच्या समाधी वृंदावनावर आधारित संशोधनाला शैक्षणिक मान्यता; कोकण इतिहास पत्रिकेत लेख प्रकाशित..

⚡देवगड ता.१९-:
कोकणच्या पवित्र आणि ऐतिहासिक भूमीत जतन झालेला शिवकालीन वारशाचा एक महत्त्वाचा दुवा संशोधनाच्या माध्यमातून पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य नारोपंत नीलकंठ यांच्या मौजे कुणकेश्वर येथील समाधी वृंदावनासंदर्भातील सखोल संशोधनपर निबंध कोकण इतिहास पत्रिका, अंक क्र. १ (जानेवारी–मार्च २०२६) मध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनाचे औपचारिक प्रकाशन शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गोन्सालो गार्सिया कला व वाणिज्य महाविद्यालय येथे पार पडले.

श्री. रणजित हिर्लेकर आणि श्री. संदीप परब यांनी संयुक्तपणे केलेल्या या संशोधनात ऐतिहासिक पुरावे, समकालीन पत्रव्यवहार, महसुली कागदपत्रे, ७/१२ उतारे, सर्व्हे नकाशे तसेच स्थानिक तोंडी परंपरांचा सखोल व चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या या ऐतिहासिक ठिकाणाचे अस्तित्व दस्तऐवजांच्या आधारे अधोरेखित करण्यात आले आहे.

सन १८७४ मधील वृंदावन संदर्भातील नोंदी आणि सन १९५४–५५ मधील महसुली अभिलेखांचा आधार घेत संशोधकांनी समाधीचे स्थान श्री कुणकेश्वर मंदिरालगत असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय त्या परिसराशी नारोपंत अमात्य यांच्या वंशजांचा सातत्यपूर्ण संबंध राहिल्याचेही पुराव्यांद्वारे समोर आले आहे.
या संशोधनामुळे कोकणातील मराठा इतिहासाच्या अभ्यासाला नवे अधिष्ठान लाभले असून स्थानिक ऐतिहासिक स्थळांविषयी जागरूकता निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.

शिवकालीन प्रशासनातील अमात्य पदाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा आणि त्या काळातील सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांचा मागोवा घेण्यासाठी हा लेख अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
कुणकेश्वरच्या पवित्र वातावरणात उभा असलेला हा समाधी वृंदावन आता केवळ एक धार्मिक स्थळ न राहता, तो कोकणच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून नव्या दृष्टीने अभ्यासला जाऊ लागला आहे. इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी हा शोध निबंध महत्त्वपूर्ण संदर्भ ठरणार असून कोकणच्या समृद्ध वारशाच्या जतनासाठी तो प्रेरणादायी ठरेल.

You cannot copy content of this page