सोनुर्ली शाळा न.१ च्या भिंतीला मोठी भेग..

तात्काळ निर्णय घ्या ; प.स सदस्य जितेंद्र गावकर व शाळा व्यवस्थापन समितीची सीईओकडे मागणी ..

⚡सावंतवाडी ता.१७-: सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या इमारतीच्या भिंतीला मोठी भेग पडली असून, ही भिंत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंजिरी गावकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
​सोनुर्ली येथील ही जिल्हा परिषद शाळा अत्यंत जुनी असून अलिकडेच या शाळेचा शतकमहोत्सव साजरा झाला आहे. मात्र, सध्या शाळेच्या एका वर्गखोलीच्या भिंतीला पडलेली भेग दिवसागणिक रुंदावत चालली आहे. सुरुवातीला लहान स्वरूपात असलेली ही भेग आता मोठ्या भेगेत रूपांतरित झाल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येणाऱ्या पावसाळ्यात ही भिंत खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या समस्येकडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंजिरी गावकर यांनी पंचायत समिती सदस्य श्री गावकर यांचे लक्ष वेधले होते.
​या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून श्री.गावकर यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत सदस्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भेट घेतली. भेटीदरम्यान शाळेच्या इमारतीची सद्यस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडला असता, श्री. खेबुडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सदर इमारत निर्लेखित करण्याच्या सूचना दिल्या असून, नवीन इमारतीचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लवकरच या शाळेची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
​या शिष्टमंडळात वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, सोनुर्ली शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सखाराम कुडतरकर, शिक्षणतज्ज्ञ नागेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य संजना राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सिमरन जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page