एकत्र येत स्थापन केला विरोधी गट..
ओरोस ता १७-: जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या भाजप आणि शिवसेना या सत्ताधाऱ्यांवर दबाव ठेवण्यासाठी अपक्ष निवडून आलेल्या सहा आणि ठाकरे शिवसेनेच्या तीन अशा एकूण नऊ जणांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी या नावाने गट स्थापन केला आहे. त्याचे पत्र मंगळवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. इन्सुली मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नितीन राऊळ यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. ९ रोजी मतमोजणी झाली होती. ही निवडणूक भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून लढली होती. यावेळी भाजप २७ आणि शिवसेना १४ असे एकूण ४१ सदस्य महायुतीचे निवडून आले होते. तर ठाकरे शिवसेनेचे केवळ तीन सदस्य निवडून आले होते. मात्र, अपक्ष म्हणून तब्बल सहा सदस्य निवडून आले. हे सहाही सदस्य भाजपचे बंडखोर आहेत. यातील कणकवली एक, कुडाळ एक, वेंगुर्ले एक आणि सावंतवाडी तीन असा समावेश आहे.
आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडी होणार आहेत. त्यापूर्वी सहा अपक्ष आणि तीन ठाकरे शिवसेना अशा एकूण नऊ जणांनी जिल्हा परिषदेत स्वतंत्र गट स्थापन करीत वेगळीच राजकीय खेळी केली आहे. अनेक राजकीय विश्लेषकांना धक्का देणारा हा निर्णय आहे. कारण बंडखोरी केली म्हणून भाजपने त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून काढून टाकले असलेतरी विजयी झाल्यानंतर या सहाही बंडखोरांना भाजप आपले दरवाजे उघडून सन्मानाने पुन्हा पक्षात घेईल, असे वाटत होते. अगदी तात्काळ निलंबन मागे घेतले नाहीतरी एक दोन वर्षात परतीचे वारे सुरू होईल, असे अपेक्षित होते. परंतु या सहाही पक्षांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी गट स्थापन करीत स्वतंत्र अस्तित्व मार्ग निवडला आहे. त्यामुळे राजकीय स्थित्यंतरे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थापन करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी गटात भाजप बंडखोर म्हणून निवडून आलेले इन्सुली येथील नितीन राऊळ, फोंडाघाट येथील राजन चिके, नेरूर देऊळवाडा येथील रुपेश पावसकर, माडखोल येथील शिवानी नाईक, कोलगाव येथील मायकल डिसोझा, तुळस येथील सुजाता पडवळ यांचा समावेश आहे. तसेच ठाकरे शिवसेनेचे पिंगुळी येथील गंगाराम सडवेलकर, उभादांडा येथील संजय गावडे आणि तुळस येथील विजय नाईक यांचा समावेश आहे.
