डॉ. स्मिता सुरवसे :नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत अंतर्गत विविध स्पर्धां संपन्न:माय भारत सिंधुदुर्गचे आयोजन..
⚡कुडाळ ता.३०-: खरंतर नशा मुक्त अभियाने राबवली लागू नयेत असा समाज घडला पाहिजे. युवकांनी वेगवेगळ्या छंदांचा अंगीकार करावा. अंमली पदार्थांपासून दूर राहावे असे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी केलं. येथिल संत राऊळ महाराज महाविद्यलयात झालेल्या माय भारत सिंधुदुर्ग आयोजित नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत अंतर्गत विविध स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. विविध आठ प्रकारात झालेल्या या स्पर्धाना जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. यातून काही स्पर्धकांची मुंबई येथे होणाऱ्या पुढच्या फेरीसाठी निवड झाली आहे.
अंमली पदार्थाना नाही म्हणा आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पहा हा संदेश देत, भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत सिंधुदुर्ग यांच्या वतीने गुरुवारी येथील संत राऊळ महाराज महाविद्यलयात नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत अंतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, नशा मुक्ती अभियानाच्या सौ. अर्पिता मुंबरकर, माय भारतच्या अपेक्षा मांजरेकर, प्रा. सबा शहा, प्रा. भावेश चव्हाण उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी बोलताना डॉ. स्मिता सुरवसे म्हणाल्या, आकडेवारी सांगते की कमी वयातली सुद्धा नशेच्या आहारी जाऊ लागली आहेत. पण आपल्या पर्यंत ही गोष्ट येऊ नये यासाठी आपण जागरूक राहिल पाहिजे. नशेचे परिणाम फक्त शारीरिकच नाहीत तर मानसिक सुद्धा होतात. त्यामुळे नशेपासून लांब रहायच ठरवा. इतर अनेक छंद आहेत, त्यामध्ये मन त्यात मन रमवा. आजकाल युवकांमध्ये इट्स कुल असा ऍटिट्यूड दिसून येतो. पण नशा करणे म्हणजे, इट्स नॉट कुल हे लक्षात ठेवा. डोपामाईन म्हणजे सुखाच्या संप्रेरकासाठी नशाच्या गोष्टी केल्या जातात अस संगीतल जात होतं, पण इतर चांगल्या मार्गाने सुद्धा ते मिळवता येत. खरतर नशा मुक्ती अभियाने राबवली जाऊ नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे डॉ. सुरवसे म्हणाल्या.
कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके म्हणाले, नशेचे विष समाजात पसरत आहे. समाजात चुकीच्या गोष्टी घडत आहेत. त्याला प्रतिकार करणे हे युवकांचे काम आहे. युवकांकडून देशाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. शासनाचा हा चांगला उपक्रम आत्मसात करा, असे आवाहन त्यांनी केले. अर्पिता मुंबरकर यांनी देखील व्यसनमुक्त समाज, सण, उत्सव साजरे होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे असे सांगितले.
त्यानंतर विवीध स्पर्धा सुरु झाल्या. यामध्ये चित्रकला, घोषवाक्य, वादविवाद, लोकनृत्य, लोकसंगीत व रॅप, रील व लघुपट, पथनाट्य, स्लॅमपोयेट्री अशा स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमधील विजेते मुंबई येथे होणाऱ्या पुढच्या फेरीत सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धांसाठी मंगेश मसके, प्रा. मंगेश जांभळे, प्रा. आवटे, प्रा. संतोष वालावलकर, निलेश जोशी, अजय सावंत, सुरेश पवार, यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपेक्षा मांजरेकर यांनी तर आभार प्रा. सबा शहा यांनी मानले.
