⚡दोडामार्ग ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शेतकरी प्रतिनिधींनी सोमवारी कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची मालवण येथील ‘निलरत्न’ निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत काजू उत्पादन करताना येणाऱ्या अडचणी, सातत्याने घसरत असलेले विक्रीदर, वाढलेला उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान तसेच बाजारात स्थानिक व आयात काजूमधील प्रतवारीचा प्रश्न आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर शेतकरी प्रतिनिधींनी आमदारांचे लक्ष वेधले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडून शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, दोडामार्ग तालुका शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई आणि खजिनदार आकाश नरसुले यांनी काजू उत्पादकांच्या अडचणींचे वास्तव चित्र मांडले.
आमदार राणे यांनी राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील काजूची आवक, सध्याची दरस्थिती, स्थानिक व आयात काजूमधील गुणवत्तेतील फरक तसेच प्रतवारी व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. विशेषतः शेजारील गोवा राज्यात काजूस मिळणाऱ्या दरांचा अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला.
शेतकरी प्रतिनिधींनी सादर केलेल्या माहितीनुसार येत्या अधिवेशनात सकारात्मक आणि ठोस लक्षवेधी सूचना मांडण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अपेक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.
