सत्तेच्या माध्यमातून विकासाची प्रत्येक हमी पूर्ण करू…

प्रभाकर सावंत:भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा कोळंब येथे सत्कार..

⚡मालवण ता.१६-:
केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. जिल्ह्यात खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आपल्याला विकास निधी कमी पडणार नाही. निवडणुकीत तुम्ही मतदारांना दिलेले विकासाचे प्रत्येक शब्द सत्तेच्या माध्यमातून पूर्ण केले जातील, अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी येथे बोलताना दिली.

भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा सत्कार सोहळा सोमवारी कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी श्री. सावंत हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, नगरसेवक मंदार केणी, शिल्पा खोत, विलास हडकर, बबलू राऊत, पंकज सादये, महेंद्र चव्हाण, विजय निकम, जीवन भोगावकर, माधुरी मसूरकर, महेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, मालवण नगरपालिकेतील पराभव आमच्यासाठी अनपेक्षित होता. पण त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपण शत प्रतिशत विजय मिळवला. प्रत्येक मतदार संघात आपण कमळ निशाणी पोहोचवली . प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण मोठा विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद च्या ५० पैकी ३१ जागा आपण लढवल्या. त्यातील २७ जागांवर आपले सदस्य विजयी झाले. तर पंचायत समितीच्या १०० पैकी ६३ जागा आपण लढवल्या. त्यातील ५८ जागांवर आपला विजय झाला आहे. हा विजय आपल्या सर्व कार्यकर्ते व नेत्यांना समर्पित आहे. यापुढील काळात मतदार संघात संपर्क, समन्वय, संवाद व सातत्य ठेऊन पाच वर्षात आपापला मतदार संघ मजबूत बांधण्याचे आवाहन त्यांनी केले. संघटना बांधणीसाठी पक्ष म्हणून भाजप पूर्ण मदत करेल. आपल्या संघटनेची मोठी ताकद आहे. ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहील. राजकारणात काम करताना काही गोष्टींवर दुर्लक्ष करा. त्याला काळ हेच उत्तर असतं. म्हणूनच लोकसभेत एकेकाळी २ सदस्य संख्या असलेला आपला पक्ष आज सत्तेत पोहोचला आहे. असेही ते म्हणाले

यावेळी अशोक सावंत म्हणाले, २०१९ पासून भाजपची तालुक्यात विजयी घोडदौड सुरु आहे. आताच्या निवडणुका आपण कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या. असे सांगून ते म्हणाले मनापासून काम केलं तर यश नक्की मिळते. केंद्रात, राज्यात आपली सत्ता आहे. प्रभाकर सावंत यांचं नेतृत्व संघटना वाढीसाठी पूरक आहे. आतापर्यँत. त्यांनी झालेल्या सर्व निवडणुका योग्य पद्धतीने सांभाळल्या आहेत, असे सांगून मी सभापती, जि. प. अध्यक्ष असताना जनतेचे प्रश्न अंगावर घेऊन सोडवले, त्याच पद्धतीने नवनिर्वाचित सदस्यांनी आपापल्या विभागातील प्रश्न हाताळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी मला माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्ता स्वतः उमेदवार म्हणून लढला. नियोजनबद्ध प्रचार केला. सभापती, उपसभापती कोणाला मिळेल सांगू शकत नाही. पण पदच काम करत हे समजू नका. तुम्ही स्वतःला सभापती, उपसभापती समजून काम करा असे आवाहन केले

यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर मंदार केणी, शिल्पा खोत यांनीही विचार मांडले. सूत्रसंचलन महेश मांजरेकर यांनी केले तर धोंडू चिंदरकर यांनी आभार मानले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page