⚡मालवण ता.१६-: महाशिवरात्री निमित्त मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरातील शिवलिंगासभोवती पंधरा थरांची अक्षतांची (तांदळाची ) महापूजा बांधून महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
शिवलिंगासभोवती बांधन्यात आलेली ही अक्षताच्या महापुजा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती
मालवण देऊळवाडा येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत पुराण वाचन, कीर्तन, पालखी मिरवणूक असे अनेक धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. या सर्व कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण म्हणजे रविवारी महाशिवरात्री दिवशी रात्री ११ ते १२ या वेळेत गाभाऱ्या तील शंकराच्या पिंडीभोवती बांधण्यात आलेली १५ थरांची तांदळाची महापूजा लक्षवेधी ठरली.
पूर्वीच्या काळी हि महापूजा बांधण्या करिता पिंडीभोवती माडाच्या झावळाच्या पाती (चुड्तीचा) उपयोग केला जात असे. पण काही वेळा तांदळाच्या वजनाने या पाती ची रिंग तुटत असल्याने महापूजा बांधण्यात अडचण निर्माण होत असे त्यामुळे अलीकडच्या काळात पाती च्या रिंगाऐवजी सोन्याचा मुलामा दिलेल्या चांदीच्या रिंगा वापरून अतिशय आकर्षक महापूजा महाशिवरात्रीला बांधण्यात येते.
या महापुजे मध्ये तांदळाचे एकावर एक असे १५ थर असतात. प्रत्येक थरावर बेलपत्र व शेवटच्या थरावर सोन्याचे पान ठेऊन ही महापूजा सजवली जाते. ही अक्षताची पूजा पाहण्यासाठी आणि ग्रामदैवत श्री रामेश्वर देवाचे आशिर्वाद घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. रात्रौ मंदिर सभोवताली पालखी प्रदक्षिणा सोहळा संपन्न झाला त्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला या वेळी मोठ्या संख्ये ने भाविक उपस्थित होते.
फोटो: मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर देवाच्या शिव पिंडीवर महाशिवरात्री निमित्त अक्षता (तांदूळ) पूजा बांधण्यात आली. छाया गणेश गावकर
