वेंगुर्ला तालुक्यात शांततेत सरासरी 69टक्के मतदान ; ओंकार ओतारी…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गण व 9 पंचायत समिती गट साठी
एकूण सरासरी 69.03
टक्के इतके शांततेत मतदान झाले. तालुक्यातील
एकूण 58,785 मतदारापैकी 40,579
मतदारांनी( पुरुष 21,211 व 19368 स्त्री) मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती वेंगुर्ला निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.
वेंगुर्ला तालुक्यात शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद – पंचायत समिती साठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत सकाळपासून सायंकाळी पर्यंत 87 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7.30 ते 9.30 वा. पर्यंत एकूण 9.98 टक्के (5,864) इतके मतदान झाले. दुपारी 11.30 वाजेपर्यंत एकूण 24.61 टक्के (14,466) इतके मतदान झाले. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 39.84 टक्के (23,419) इतके मतदान झाले .दुपारी 3.30 वाजेपर्यंत 53.03 टक्के (31,171) इतके मतदान झाले. तर शेवटच्या टप्प्यात 5.30 वाजेपर्यंत एकूण 69 टक्के (40,579) इतके मतदान झाले. प्रशासनातर्फे सखी केंद्र – कै. रायसाहेब डाॅ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं 1,युवा केंद्र – जि.प. पुर्ण प्राथमिक केंद्रशाळा परुळे नं 3 व आदर्श केंद्र – जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा आडेली नं. 1. अशी रचना ठेवण्यात आली होती. तालुक्यातील परुळे येथील मतदान केंद्रावर माधवी दाभोलकर या नववधूने मतदानाचा हक्क बजावला व मतदान करुन ती लग्नमंडपात निघाली.
तालुक्यात एकूण 87 मतदान केंद्रावर प्रशासनातर्फे 87 बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच मशीनमध्ये बिघाड झाल्यास प्रत्येक गणासाठी 2 अशी 20 बॅलेट मशिन्स राखीव ठेवण्यात आली होती. सकाळी कोचरे श्रीरामवाडी येथील केंद्रावर व सकाळी 9.30 नंतर परुळे गवाण येथील केंद्रावर बॅलेट मशीनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे त्वरित दोन्ही ठिकाणी दुसऱ्या मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या. तालुक्यातील मतदान प्रक्रियेसाठी राखीवसह एकूण 384 अधिकारी – कर्मचारी, 9 पोलीस अधिकारी, 87 पोलीस, 73 होमगार्ड कार्यरत होते. संपूर्ण वेंगुर्ला, निवती, रेडी व अन्य भाग तालुक्यासाठी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व निवती एपीआय भीमसेन गायकवाड, पीएसआय योगेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी वेंगुर्ला तालुक्यातील काही मतदान केंद्रास भेट दिली. तर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पदाधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघात व्हिजिट देऊन आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजन गवस व दिनेश पाटकर, अतिरिक्त
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत किरुळकर यांच्या योग्य नियोजनात प्रशासनातर्फे निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

You cannot copy content of this page