आमडोस माजी सरपंच दिगंबर नके यांचे निधन

चौके पंचक्रोशित हळहळ

*💫मालवण दि.१८-:* मालवण तालुक्यातील आमडोस गावचे माजी सरपंच दिगंबर लक्ष्मण नके यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. नके यांच्या निधनाने आमडोस गावचे मोठे नुकसान झाले असून चौके पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दिगंबर नके हे आमडोस गावचे सलग २० वर्षे उपसरपंच होते. मागील कार्यकारिणीमध्ये त्यांनी प्रभारी सरपंच म्हणून काम पाहिले होते. गावात शासनाच्या विविध योजना आणण्यात त्यांचा हातखंडा होता. आमडोस गाव संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छ्ता अभियानमध्ये राज्यात प्रथम येण्यामागे नके यांची प्रचंड मेहनत होती. राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांचे भरिव काम आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री खा नारायण राणे यांच्यासोबत त्यांनी सेनेचे काम सुरु केले होते. खा राणेंसोबत त्यांनीही सेनेला जय महाराष्ट्र केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी खा विनायक राऊत यांच्यावर विश्वास ठेवत पुन्हा सेनेत प्रवेश केला होता. मालवण तालुक्यात एक भारदस्त नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. १५ मे रोजी एका अल्पशा आजारावर त्यांच्यावर उपचार सुरु असताना रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. नके यांच्या निधनाने आमडोस गावचे कधीच भरून न निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या रूपाने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व सहकार क्षेत्राची उत्तम जाण असणाऱ्या व्यक्तीला आमडोस गाव कायमस्वरूपी मुकला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, एक अविवाहित मुलगी, जावय, नातवंडे, तीन भाऊ, भावजय, पुतणे, पुतनी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page