मध्यरात्रीची घटना: नगरपालिकेच्या अग्निशमन बंबामुळे आग आटोक्यात…
⚡सावंतवाडी ता.२५-: येथील गरड येथील जुन्या संचयत इमारतीच्या बाजूला असलेल्या गवताला काल मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाशी संपर्क साधला. नगरपालिकेच्या बंबाने घटनास्थळी दाखल होत वेळीच आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सदर आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत शहरात गवताला आग लागण्याची ही दुसरी घटना असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घेण्याची मागणी होत आहे.
