साहित्यिक वैशाली पंडित यांच्या लेखनात कोणाचेच अनुकरण नाही…

कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर:मालवणात साहित्यिक वैशाली पंडित यांच्या ‘आगीनझाड’ कथासंग्रहाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात..

⚡मालवण ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे ११ जानेवारी २०२६ रोजी ‘आगिनझाडची पंचविशी’ हा विशेष सोहळा संपन्न झाला. मालवणच्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित लिखित ‘आगीनझाड’ ह्या कथासंग्रहाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली यानिमित्त हा विशेष ‘रौप्यपर्व पूर्ती सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.

हा सोहळा, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण संस्थेच्या दादासाहेब शिखरे सभागृहात ‘बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण, साने गुरुजी वाचन मंदिर मालवण आणि ऐलमा पैलमा अक्षर देवा सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कोमसाप केंद्रीय अध्यक्ष तथा कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. नमिता कीर, बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर व कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित व साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच कोमसाप केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात, साहित्यिक वैशाली पंडित यांचे ‘आगिनझाड पंचवीशी’ बद्दल अभिनंदन केले आणि साहित्यिक वैशाली पंडित यांचे लेखन हे कोणत्याही लेखकाच्या अनुकरणाशिवाय असलेली प्रतिभा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सुरवात ‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थनेने करण्यात आली. मान्यवरांचे व उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. नमिता कीर, बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, साहित्यिक वैशाली पंडित, राष्ट्रीय पारितोषिक विजेते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते श्री. अभय खडपकर, अनुवादिका वंदना करंबेळकर, ॲड. अपर्णा प्रभू परांजपे, डॉ. गौरी गणपत्ये व लेखिका वैशाली पंडित यांच्या भगिनी सौ. वृंदा थोरात यांचे सोनचाफ्याचे फूल व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रुजवणाला जलसिंचन करण्यात आले.

कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

ॲड. अपर्णा प्रभू परांजपे यांनी ‘आगीनझाड’ या कथेचे प्रभावी अभिवाचन केले. ‘आगीनझाड’ पुस्तकावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष परिसंवादामध्ये अनुवादिका वंदना करंबेळकर, ॲड. अपर्णा प्रभू परांजपे, अभिनेता अभय खडपकर व कोमसाप अध्यक्ष नमिता कीर सहभागी झाल्या .

नमिता कीर यांनी कथा कशी असावी, कथेचे मर्म आणि पुढील लेखनाच्या दिशा यावर भाष्य केले. परिसंवादाची प्रस्तावना, सूत्रसंचालन व आभार डॉ. गौरी गणपत्ये यांनी मानले. यावेळी परिसंवादातील सहभागी मान्यवरांना पंडित परिवारातर्फे झाडाची प्रतिकृती भेट देत सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर आयोजकांच्या वतीने लेखिका वैशाली पंडित यांना नमिता कीर व किशोर शिरोडकर यांच्या हस्ते विशेष मानपत्र प्रदान करण्यात आले.

गज़लकार डॉ. माधुरी चव्हाण जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले. ऐलमा पैलमा अक्षर देवा सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्या वतीने लेखिका वैशाली पंडित यांचा सौ. अलका नारकर यांनी भेटवस्तू प्रदान करत गौरव केला.

पंडित परिवाराकडून लेखिका वैशाली पंडित यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. गीता कामत व गिरीजा प्रभुदेसाई यांनी यावेळी वैशाली पंडित यांचा विशेष सत्कार केला.

‘आगीनझाड’ कथा प्रकाशित केलेले अंतर्नादचे संपादक भानू काळे यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे अर्चना कोदे यांनी वाचन केले. प्रकाशक वामन पंडित यांच्या मनोगताचे वंदना करंबेळकर यांनी वाचन केले. तसेच अमेरिकास्थित वसुंधरा पर्वते यांचा ध्वनिफीत शुभेच्छा संदेश ऐकवण्यात आला. वैशाली पंडित परिवाराच्या वतीने लेखिका वैशाली पंडित यांच्या भगिनी सौ. वृंदा थोरात यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. ज्योती बुवा तोरसकर यांनी लेखिका वैशाली पंडित यांची मुलाखत घेतली. यावेळी लेखन प्रवासाची पार्श्वभूमी, अनुभव, पुस्तकांची सरोगेट मदर ही आगळीवेगळी संकल्पना, कथेचा फाॅर्म असे विविध प्रश्न विचारण्यात आले. तसेच नवोदित लेखकांसाठी ही मुलाखत म्हणजे जणू कार्यशाळाच ठरली, अशी प्रतिक्रिया रसिक श्रोत्यांनी दिली.

ॲड. अपर्णा प्रभू परांजपे, संपदा प्रभुदेसाई, स्वाती सावंत व सानिका वायंगणकर यांनी ऐलमा पैलमा अक्षर देवा समूहाच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता केली.

ह्या कार्यक्रमाची संकल्पना, लेखिका वैशाली पंडित यांच्या एक वाचक सौ. गायत्री जोशी ( पूर्वाश्रमीच्या कृपा काळे, देऊळवाडा, मालवण) यांनी मांडली होती या संकल्पनेला डाॅ. सुमेधा नाईक, डाॅ. ज्योती तोरसकर व सेवांगणच्या वतीने कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर व व्यवस्थापक संजय आचरेकर आणि ऐलमा पैलमा अक्षरदेवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूहातील सदस्यांचे प्रत्यक्ष योगदान व सहकार्य लाभले.

यावेळी लेखिका वैशाली पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन व जमा – खर्च कथेचे पोस्टर लावण्यात आले होते. तसेच वैशाली पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधील ‘अनोख्या शब्दांनी’ लगडलेल्या झाडाची प्रतिकृती प्रमुख आकर्षण होते.

कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.

यावेळी कै. विद्याधर करंदीकर यांच्या पत्नी वैजयंती करंदीकर, कृपा काळे यांच्या मातोश्री सौ. मालती काळे ( काळेबाई) , संस्कृती बांदकर, मैत्रेयी बांदेकर, श्रुती बांदेकर, त्रिंबक आजगावकर, दिलीप हुनारी, प्रसाद तोंडवळकर, मेहेक शेख़, रंजन तांबे व बहुसंख्येने रसिक साहित्यप्रेमी श्रोते, विद्यार्थी, सेवांगण व्यवस्थापक व कर्मचारी तसेच साहित्यिक वैशाली पंडित यांचे वाचक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. ज्योती बुवा तोरसकर, सेवांगण संस्था, साने गुरुजी वाचन मंदिरच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर आणि सहाय्यक गौरी केळुसकर, सेवांगण व्यवस्थापक संजय आचरेकर व ऐलमा पैलमा अक्षर देवा समूहाने मेहनत घेतली.

एखाद्या लेखकाच्या हयातीत त्याच्या एका पुस्तकला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा आयोजित करण्याची एक नूतन संकल्पना ‘आगिनझाड’ कथासंग्रहाची लेखिका या नात्याने अनुभवल्याची भावना अवर्णनीय असल्याची प्रतिक्रिया साहित्यिक वैशाली पंडित यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page