⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल होणार असून, शिंदे शिवसेनेकडून अजय गोंदावळे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशी माहिती शिंदे शिवसेनेच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भाजप–शिंदे शिवसेना युतीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसला तरी, शिंदे शिवसेनेकडून अजय गोंदावळे यांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. सध्या नगरपरिषदेत भाजपचे ११ तर शिंदे शिवसेनेचे ७ नगरसेवक आहेत. या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवरही अजय गोंदावळे हे आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, भाजपकडून उपनगराध्यक्ष पदासाठी अॅड. अनिल निरवडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, तेही उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उपनगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या या निवडणुकीकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
