उपनगराध्यक्ष निवडीत नगराध्यक्षांचे कणकवलीवरील बेगडी प्रेम उघड…

माजी उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांचा आरोप:टप्प्याटप्प्याने पोलखोल करण्याचा इशारा..

⚡कणकवली ता.१३-:
उपनगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे कणकवली गावावरील बेगडी प्रेम कणकवलीकरांनी अनुभवले, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे विद्यमान स्वीकृत नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला. भाजपने गावऱ्हाटीमधील मानकरी व्यक्ती राकेश राणे यांना उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली असताना, निर्णायक मताचा वापर करून आमच्या उमेदवाराचा पराभव करण्यात आला. यावरून ‘माझे गाव, माझे गाव’ म्हणणाऱ्यांचे गावावरील प्रेम किती बेगडी आहे, हे स्पष्ट झाले आहे, असा टोला त्यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना लगावला.

कणकवली येथील समीर नलावडे जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बंडू हर्णे बोलत होते.

यावेळी भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक राकेश राणे, स्वप्नील राणे, नगरसेविका प्रतीक्षा सावंत, प्रशांत सावंत, औदुंबर राणे, मिथुन ठाणेकर आदी उपस्थित होते.

बंडू हर्णे म्हणाले, कणकवलीच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला १७ पैकी ९ नगरसेवक निवडून देत बहुमताचा कौल दिला होता. या जनादेशाचा सन्मान राखत नवनिर्वाचित नगरसेवक राकेश राणे यांना उपनगराध्यक्ष पदासाठी पुढे करण्यात आले. गावातील व्यक्तीला सन्मान मिळावा, या उद्देशाने ही उमेदवारी दिली होती. मात्र निर्णायक मताचा अधिकार वापरून भाजप उमेदवाराचा पराभव करण्यात आला. यावरून नगराध्यक्ष कोणाबरोबर आहेत आणि कोणाबरोबर नाहीत, हे स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

नगरपंचायत निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी पक्षाने मला स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली, याबद्दल खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे श्री
हर्णे यांनी आभार मानले. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांचे अभिनंदन देखील केले.

यापूर्वी उपनगराध्यक्ष पदावर गावातील व्यक्तींना सन्मान देण्यात आला होता. किशोर राणे, बाबू गायकवाड यांसारख्या गावातील सदस्यांनी हे पद भूषवले होते, असे सांगत ते म्हणाले की, आमची सत्ता नसली तरी आम्ही आणि आमचे नऊ नगरसेवक नगरपंचायतीत सक्रिय राहणार आहोत. पद नसले तरी जनतेच्या सेवेसाठी आम्ही कायम तत्पर राहू, हे दाखवून देऊ. कणकवलीच्या विकासाची जबाबदारी आता सत्ताधाऱ्यांची आहे. मात्र चांगल्या कामात आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, आणि चुकीच्या कामांची पोलखोल जनतेसमोर केल्याशिवाय राहणार नाही.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी स्वच्छ कारभार व भ्रष्टाचारमुक्त कणकवलीचे केलेले विधान स्वागतार्ह असल्याचे सांगत बंडू हर्णे म्हणाले, आता ते सत्तेत आहेत, त्यामुळे सर्व प्रकल्पांची चौकशी लावून तपासणी करावी. मात्र अशी चौकशी करण्याची त्यांची हिम्मत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मीटर व बकेट घोटाळ्याची चौकशी लावून दोषी कोण आहेत, हे जनतेसमोर आणावे, अशी मागणीही यावेळी बंडू हर्णे यांनी केली.

You cannot copy content of this page