वेंगुर्ला वायंगणी आवेरा येथे आग लागून आंबा काजू कलमे जळून खाक…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुक्यातील
वायंगणी तळेकरवाडी सडा कार्यक्षेत्रातील आवेरा येथे आज शनिवारी (दि. 10 जानेवारी )सकाळी 10 वा. च्या सुमारास आकस्मिक आग लागून आंबा – काजू कलमे जळून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर माळरानावरील सुमारे दहा हेक्टर एरियातील चारा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे. दरम्यान प्रशासन यंत्रणाच्या कार्यक्षमतेबद्दल सरपंच अवि दुतोंडकर व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आज शनिवारी सकाळी वायंगणी तळेकरवाडी सडा कार्यक्षेत्रात आग लागल्याने स्थानिक ग्रामस्थांची धावपळ उडाली. यामध्ये येथील शेतकरी सुनिल राजाराम सावंत यांची आंबा व काजू कलमे जळून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये माळरानावरील चारा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे. ही आग विझविण्यासाठी अमित सावंत व विनोद दुतोंडकर यांनी आपल्या पीकअप वाहनातून मधून पाणी आणून पोवर स्प्रे द्वारे आग विझविण्यासाठी सहकार्य केले. तसेच वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, ग्रा. पं. सदस्य विनू मठकर, समिर केळूसकर, रामचंद्र मांजरेकर, सचिन वाडेकर, प्रताप करंगुटकर, दिलीप सावंत, रतन धुरी, भिकाजीं गावडे आदी व अन्य ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वायंगणी आवेरा येथे आग लागल्याची माहिती मिळताच सरपंच अवि दुतोंडकर यांनी वेंगुर्ला नगरपरिषद अग्नीशमन ला संपर्क केला असता अग्नीशमक बंब दुरुस्तीसाठी कणकवली येथे गेल्याचे सांगण्यात आले. तर कुडाळ एमआयडीसी येथे संपर्क साधला असता 15 हजार रुपये चार्ज असल्याचे सांगण्यात आले. सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना हे परवडणारे नसल्याने सरपंच व ग्रामस्थांनी शासनाच्या अकार्यक्षमतेबद्दल तीव्र शब्दात रोष व्यक्त केला आहे. ही आग ग्रामस्थांनीच विझविली. दरम्यान सायंकाळी उशिरा ओरोस येथून अग्निशमन बंब दाखल झाला होता.

You cannot copy content of this page