मालवण नगरपालिकेच्या प्रशासनाकडून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार…

उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप:जनतेच्या पैशांचा हा अपहार खपवून घेणार नाही..

⚡मालवण ता.१०-:
मालवण नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात कचरा व्यवस्थापन आणि विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप उबाठा शिवसेना पक्षाचे नगरपालिकेचे गटनेते महेंद्र म्हाडगुत यांनी पत्रकार परिषदेत केला. नगरसेवक नसले की प्रशासन मनमानी कारभार करते, हेच यातून सिद्ध होत असून आम्ही जनतेच्या पैशांचा हा अपहार खपवून घेणार नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे, असा इशाराही श्री. म्हाडगुत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मालवण येथील उबाठा शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, ॲड. सुमित जाधव, तेजस नेवगी, दत्ता पोईपकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते.

यावेळी महेंद्र म्हाडगुत म्हणाले, मालवण नगरपालिकेच्या गेल्या चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत मालवण शहरातील कचरा विलगीकरण आणि खत निर्मितीसाठी लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात खत निर्मिती शून्य आहे. याबाबत आम्ही प्रत्यक्ष डम्पिंग यार्डची पाहणी केली असता तिथे यंत्रसामग्री बंद अवस्थेत आढळली. कागदावर १६ कामगार दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात केवळ ५-६ कामगार कार्यरत होते. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कामगारांची हजेरी नगरपालिकेत लावली जाते, तेच कामगार शहरातील खासगी मॉल्स आणि दुकानांमध्ये कामाला आहेत. कामगारांच्या नावावर पैसे उचलून ते पुन्हा त्यांच्याकडून काढून घेतले जात असल्याचाही संशय आहे.
२०२२-२३ या ६ महिन्यांत १४ लाख ५८ हजार खर्च दाखविण्यात आला तर खत निर्मिती शून्य आहे. २०२४ या वर्षात ५७ लाख ५६ हजारांचे टेंडर काढण्यात आले. त्यातील ३५ लाख अदा केले तर खत निर्मिती शून्य आहे. एवढा मोठा खर्च होऊनही कचऱ्याचे ढीग तसेच असून ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ का दिली जाते ? डम्पिंग यार्ड मधील कचरा फक्त दुसऱ्यांच्या जागेत टाकण्याचे काम सुरु असून आजपर्यंत खर्च झालेला पैसा कुठे जिरला आहे ? असा प्रश्नही यावेळी श्री. म्हाडगुत यांनी उपस्थित केला.

मालवण शहरातील आडवण दलित वस्तीतील पाणीपुरवठा आणि पंप बसवण्याच्या कामातही मोठा गैरप्रकार समोर आला आहे. ज्या कामासाठी १ लाख ४७ हजारांची निविदा काढण्यात आली, ते काम प्रत्यक्षात ४० ते ५० हजारांचे आहे. वायरचे अंदाजपत्रक बघितले तर ते अवास्तव होते. आम्ही पाहणी केली तेव्हा पंप आणि पॅनल आधीच बसवलेले होते आणि पाणीपुरवठा सुरू होता. जर काम आधीच झाले होते, तर निविदा कोणासाठी काढली? हा प्रकार म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाललेला भ्रष्टाचाराचा कळस आहे, असे म्हाडगुत म्हणाले.

नगरसेवक कशाला हवेत? असे विचारणाऱ्यांना हे उत्तर आहे. प्रशासकीय काळात जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्याला आळा घालण्यासाठी आणि जनतेच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी नगरसेवकच हवेत. आम्ही सध्या विरोधी पक्षात असलो तरी सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासनावर अंकुश ठेवून मालवणच्या जनतेला दर्जेदार सेवा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास महेंद्र म्हाडगुत यांनी व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली जाणार आहे. जोपर्यंत संबंधित दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना पाठपुरावा सोडणार नाही, असा इशाराही यावेळी नगरसेवकांनी दिला.

You cannot copy content of this page