मौजे तिरोडा येथे उभारण्यात आलेले बीएसएनएल टॉवर गेले दहा महिन्यापासून बंदच…

सागर नाणोसकर यांनी वेधले बीएसएनएल अधिकाऱ्यांचे लक्ष: पुढील आठ दिवसात न सुरू केल्यास 26 जानेवारीला आंदोलन..

⚡सावंतवाडी ता.०७-:
सावंतवाडी तालुक्यातील मौजे तिरोडा येथे उभारण्यात आलेला बीएसएनएल टॉवर मंजुरीनंतरही गेल्या दहा महिन्यांपासून सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांनी बीएसएनएल प्रशासनाकडे टॉवर तातडीने सुरू करण्याची मागणी करत लेखी तक्रार दाखल केली आहे.

ते म्हणाले मौजे तिरोडा येथे सुमारे पाच वर्षांपूर्वी बीएसएनएल टॉवरला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊनही सदर टॉवर अद्याप कार्यान्वित करण्यात आलेला नाही. परिणामी मौजे नाणोस व गुळदेव या परिसरातील नागरिकांना मोबाईल नेटवर्कच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. नेटवर्कअभावी दैनंदिन संपर्क, ऑनलाईन सेवा तसेच आपत्कालीन प्रसंगी अडचणी निर्माण होत असून ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे.
टॉवर सुरू करण्यासाठी ग्रामस्थांकडून पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविण्यात आली असून कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र बीएसएनएलचे अधिकारी याबाबत उदासीन भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील आठ दिवसांत टॉवर सुरू न केल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी बीएसएनएल टॉवर परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी बीएसएनएल प्रशासनावर राहील, असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page