सावंतवाडी गणपती मंदिर परिसरात सांडपाण्याचा नागरिकांना होतोय त्रास…

अमित गवंडळकर यांनी नागरिकांच्या उपस्थितीत वेधलं नगराध्यक्षांचे लक्ष: त्वरित उपयोजना करू, नगराध्यक्षांचं आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.०७-:
सावंतवाडी शहरातील गणपती मंदिराजवळील परिसरात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नसल्यामुळे नागरिकांना तसेच भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी अमित गवंडळकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे तक्रार करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात ते म्हणाले, गणपती मंदिरासमोर बालाजी मंदिर असून या दोन्ही मंदिरांमध्ये दररोज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच परिसरात कुलदैवत काळभैरवाचे मंदिरही आहे. मात्र मंदिर परिसरापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या सुलभ शौचालयाजवळील सांडपाण्याची गटारे अडकल्यामुळे पावसाळ्यात सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत मंदिर परिसरात शिरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून भाविकांना तसेच स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या सांडपाण्यामुळे मंदिर परिसर अस्वच्छ होत असून धार्मिक स्थळांच्या पवित्रतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत चंद्रशेखर उर्फ नानासाहेब पोकळे, सचिन सुभाष पोकळे, अशोक विलास मेस्त्री आणि प्रविण मुरारी पोकळे या नागरिकांनी नगराध्यक्षांकडे निवेदन सादर करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
नगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष देऊन गटार दुरुस्ती व सांडपाण्याच्या व्यवस्थेची कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page