⚡सावंतवाडी ता.०४-:
“उंची लहान, पण किर्ती महान” या वाक्प्रचाराचा प्रत्यय सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कु. कबीर नवीद हेरेकर याने खऱ्या अर्थाने समाजाला दिला आहे. अवघ्या दहाव्या वर्षी कबीरने तब्बल ५० मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेत सर्व स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
आज, ४ जानेवारी रोजी, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत कबीरने ५ किलोमीटरचे अंतर केवळ २५ मिनिटांत पूर्ण करत आपली ५० वी मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोव्यातील I-Run Foundation या संस्थेच्या वतीने त्याला मेडल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
आजची युवा पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकलेली असताना, कबीरने खेळाच्या माध्यमातून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. या ५० मॅरेथॉनमध्ये कबीरने २, ५, १०, ११, २१ व २५ किलोमीटर अशी विविध अंतरांची शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
विशेष बाब म्हणजे, गोवा–सावंतवाडी इंटरसिटी रनमध्ये २५ किलोमीटर तसेच शिवजयंतीनिमित्त आरमार रनमध्ये २१ किलोमीटर अंतर पूर्ण करणारा कबीर हा सर्वात लहान वयाचा धावपटू ठरला आहे. याशिवाय, सिंग यंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सलग दोन वर्षे द्वितीय क्रमांक, तसेच पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, टाटा 10K चॅलेंज, छित्री अल्ट्रा, कुडाळ रेन रन, रोटरी रन गोवा, बेळगावी हिली रन, कर्नाटक रोटरी मॅरेथॉन अशा अनेक नामांकित स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे.
कबीरच्या धावण्याप्रती असलेल्या विशेष आवडीची दखल घेत सिंधु रनर, रमाणी फाऊंडेशन गोवा, रोटरी क्लब बेळगावी, K.A. Sports मुंबई, पुणे कॅन्टोन्मेंट, I-Run Foundation गोवा आदी संस्थांनी त्याचा विविध स्तरावर सन्मान केला आहे.
प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष गुण असतात, त्याला योग्य दिशा व वाव देणे गरजेचे असते, असे मत कबीरचे पालक श्री. नवीद हेरेकर व सौ. नबीला हेरेकर यांनी व्यक्त केले. कबीरच्या या यशात शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ऑलिंपिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावणे हेच कबीरचे स्वप्न असून, त्याच्या आजवरच्या कामगिरीमुळे तो भविष्यातील एक उज्ज्वल धावपटू ठरेल, यात शंका नाही.
