बांदा सटमटवाडीत जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी…

ग्रामस्थांचा केळीचे झाड लावून अनोखा निषेध:तातडीची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा..

⚡बांदा ता.०४-: बांदा सटमटवाडी येथे महामार्गालगत जलजीवन मिशन अंतर्गत टाकण्यात आलेली जलवाहिनी फुटल्याने गेल्या काही दिवसांपासून दररोज हजारो लिटर पाणी अक्षरशः वाया जात आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे संबंधित ठिकाणी मोठा खड्डा पडला असून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) बांदा शहर अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. जलवाहिनी फुटून पडलेल्या खड्ड्यात केळीचे झाड लावून प्रशासन आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यात आला. तसेच योग्य दखल न घेतल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित ठेकेदार व प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र वारंवार तक्रारी करूनही ठेकेदाराकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाण्याची नासाडी सुरूच राहिल्याने तसेच रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने नागरिकांचा संयम अखेर सुटला. आज सकाळी ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. जलवाहिनी फुटून पडलेल्या खड्ड्यात केळीचे झाड लावून प्रशासन आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यात आला. हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
यावेळी साईप्रसाद काणेकर यांनी सांगितले की, पाणी वाचवण्याबाबत शासन एकीकडे जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधितांनी तातडीने जलवाहिनी दुरुस्त करून रस्ता सुरक्षित करावा, अन्यथा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी प्रदीप कळंगुटकर, विठ्ठल केळुस्कर, सुरज मांजरेकर, विवेक केळुस्कर, संजय केळुस्कर, महेंद्र मांजरेकर, विशाल कळंगुटकर, बंड्या गिरप, सुभाष शिरोडकर, आनंद वसकर, किरण नाईक, भाऊ अळवणी, सचिन वीर,प्रमोद कळंगुटकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page