⚡कणकवली ता.०३-: बेंगलोर येथील श्रीनिवास रेड्डी यांच्या सिंधुदुगार्तील हत्या प्रकरणातील फरार संशयित आरोपी व्यंकटेश बाबू राहणार बेंगलोर याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
२३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्ह्यातील तिलारी येथील मुख्य वसाहतीजवळील पुलाच्या बाजूला रक्ताने माखलेली एक कार आढळून ह्यआली होती. तर याच दिवशी कणकवली तालुक्यातील साळिस्ते ह्ययेथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात मृतदेह हा बंगलोर येथील श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याची बाब स्पष्ट झाली होती. तसेच तिलारी येथे सापडलेली कारही त्यांचीच असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी मधुसुदन तोकला, सुभाष सुब्बारायप्पा एस, नरसिंहा मूर्ती, मनु पी बी, वर्धन के एन (सर्व राहणार कर्नाटक राज्य) या पाच संशयितांना अटक केली होती. सद्यस्थितीत ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तर व्यंकटेश बाबू, सुजय बी, चिलडा नाडप्पा, संतोष, (सर्व राहणार कर्नाटक राज्य) हे चार संशयित फरार असून पोलिसांच्या रडारवर आहेत. यावरील सुनावणीत व्यंकटेश बाबू हा मुख्य सूत्रधार असल्याने तो चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात येणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच बंगलोर येथील पोलीस ठाण्यात त्याच्यावर बनावट कागदपत्रप्रकरणी गुन्हा दाखल आहे. श्रीनिवास रेड्डी यांचा खून करण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश काय होता, हे समोर येण्यासाठी त्याला अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्याची मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली.
