⚡बांदा ता.०१-: खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय, बांदाचे मुख्याध्यापक तथा क्रीडा शिक्षक नंदकिशोर (नंदू) नाईक हे नियत वयोमानानुसार ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या भेडशी, मडूरा व बांदा येथील शाळांमध्ये त्यांनी ३४ वर्षे क्रीडा शिक्षक, पर्यवेक्षक व मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली.
स्वतः उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा शिक्षक व पंच म्हणून ओळख असलेल्या श्री नाईक यांनी क्रीडा समन्वयक म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३६ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर, तर अनेकांनी राज्य, विभागीय व जिल्हा स्तरावर सहभाग घेतला. क्रीडा भूषण व आदर्श क्रीडा मार्गदर्शक यांसह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा सोहळा खेमराज हायस्कूलमध्ये पार पडला. यावेळी त्यांच्या पत्नी कीर्ती नाईक, श्रीपाद नाईक, माजी मुख्याध्यापक एम डी मोरबाळे, भेडशी हायस्कुलचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक, माजी मुख्याध्यापक माधवी सावंत, गुरुनाथ नार्वेकर, संस्थेचे पदाधिकारी, संस्था संचलित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी व कुटुंबीय उपस्थित होते. अनुभवी शिक्षकाच्या सेवानिवृत्तीमुळे संस्थेची हानी झाल्याची भावना कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना, ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेचा मुख्याध्यापक म्हणून सेवा पूर्ण केल्याचे समाधान असल्याचे नंदू नाईक यांनी सांगितले.
फोटो:-
बांदा येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नंदू नाईक यांचा सत्कार करताना मान्यवर.
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नंदू नाईक ३४ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त…
