फार्मसी विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील फार्मसी कॉलेज सहभागी..

⚡कुडाळ ता.३१-: असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडिया (APTI) महाराष्ट्र राज्य शाखा आणि श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी,डिगस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘त्विशा 2.0’ (TVISHA 2.0) क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कोंकण चॅप्टरचे उद्घाटन आप्ती MS महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.राकेश सोमाणी यांच्या हस्ते ओरोस क्रिडा संकुलात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
या प्रसंगी व्यासपीठावर ‘आप्ती’चे कार्यकारी परिषद सदस्य डॉ.संदिप झिने, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका सौ. नुतन परब, एस पी.एस कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.युवराज पांढरे, ज्ञानदिप कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुजीत नगरे (कोकण समन्वयक), विजयराव नाईक कॉलेज प्राचार्य राजेश जगताप, विवेक कुलकर्णी (त्विशा कोकण निमंत्रक), यशवंतराव भोसले डिप्लोमा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सत्यजित साठे, तन्मय पटवर्धन, सरस्वती कॉलेज प्राचार्या डॉ.रोहिणी विचारे, एस‌ पी एस कॉलेज विभाग प्रमुख श्री.संदेश सुळ, कार्यक्रम समन्वयक श्री.शंकर मुसळे, श्री.अमित शहापूरकर आदि मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना डॉ.सोमानी म्हणाले कि केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे काळाची गरज आहे. सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी व चैतन्य निर्माण होते. ‘आप्ती एम एस त्वीशा’च्या माध्यमातून आम्ही सदैव विद्यार्थी व फार्मसी शिक्षकांच्या हिताचे उपक्रम राबवित राहु.
यावेळी महाराष्ट्र राज्य APTI MS चे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. संदीप झिने यांनी त्विशा संकल्पनेचे महत्त्व विषद केले. मुंबई आणि कोंकण चॅप्टरचे स्वतंत्र आयोजन केल्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थी व स्नेही यांनी असेच उपक्रम नेहमी आयोजित करावेत ज्यातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा कस लागेल असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष श्री. भुपतसेन सावंत यांनी केले.
​या कार्यक्रमानंतर तेथील मैदानावर धावणे व खो खो घ्या स्पर्धा पार पडल्या. चुरशीच्या लढतीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ८ नामांकित महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धा ​निकाल खालीलप्रमाणे:
​खो-खो (मुले व मुली) : यजमान श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीने दोन्ही गटात प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. तर द्वितीय क्रमांक इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (मुले व मुली) साडवली, देवरुख यांनी मिळवला.
​४०० मीटर धावणे (मुले): सोहम घाग (श्री. सरस्वती कॉलेज ऑफ फार्मसी, तोंडवली) याने प्रथम, तर प्रतीक रेवाळे (इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली, देवरुख) याने द्वितीय क्रमांक मिळवला.
​२०० मीटर धावणे (मुली): कु. प्रगती देसाई (श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी) हिने प्रथम, तर प्रांजली खाडे (गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या कार्यक्रमात विजेत्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्राने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.पाढरे यांनी मार्गदर्शन केले. उर्वरीत स्पर्धा 18 जानेवारीपर्यंत सहभागी विविध कॉलेजमध्ये पार पडणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक महादेव परब यांनी केले.
संस्थाध्यक्ष भूपतसेन सावंत आणि कॅम्पस डायरेक्टर सौ. परब यांच्या खंबीर पाठबळामुळे या स्पर्धांचे आयोजन यशस्वी झाले.

You cannot copy content of this page