मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन*
मालवण : (प्रतिनिधी) मालवणममध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यावर कड़क लॉकडाउन हा केलेला एक उपाय असून त्यास मालवणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तरीही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः बरोबर कुटुंबाची काळजी घेताना शासनाच्या नियमांचे पालन करूया. कोरोना साखळी तोडण्यात महत्वाचा दुवा बनूया. कोरोनाचे संक्रमण कमी झाले पाहिजे, यासाठी संघटितपणे लढ़ा देऊया आणि मालवण शहर कोरोनामुक्त करूया असे आवाहन मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे. शासनाच्या ‘ब्रेक द चैन’च्या पुढे जावून गेले ५ दिवस मालवण शहर कडकडित बंद ठेवून पालकमंत्री यांच्या हाकेला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मालवण वासियांचे, व्यापारी बंधूंचे मनापासून आभार मानले आहेत. मालवणमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यावर कड़क लॉकडाउन हा केलेला एक उपाय. तरीही धोका पूर्णपणे टळलेला नाही. मागच्या वर्षी मालवण शहरात ८ महिन्याच्या कालावधीत सुमारे २४० कोरोना रुग्ण सापडले. मात्र आता मागील १ ते २ महिन्यात सुमारे ४७५ रुग्ण सापडले. दर दिवशी सरासरी २० रुग्ण वाढत आहेत. मृत्युचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ही स्थिती पाहता पुढील लॉकडाऊन जिकडे रुग्ण जास्त तिकडे लॉकडाउन आणि जिकडे रुग्ण संख्या कमी तिकडे लॉकडाउन मध्ये शिथिलता असा निर्णय शासन, प्रशासन स्तरावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नगराध्यक्ष कांदळगावकर म्हणाले. व्यापारी संघटनेने स्वतःची मार्गदर्शक तत्वे ठरवावी उद्या १५ मे पासून अत्यावश्यक सेवेची दुकाने ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. तरी वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. अत्यावश्यक सेवा सोडून जे व्यवसाय बंद आहेत ते कसे लवकरात लवकर सुरु करता येतील या दृष्टीने व्यापारी वर्गाने शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या पलीकडे जावून स्वतःची मार्गदर्शक तत्वे तयार केली पाहिजेत. व्यापारी संघटनेने या नियोजनासाठी आपलीच एक कमिटी केली पाहिजे. आपला व्यापारी बंधु या कोरोनाच्या लढाईसाठी तयार केला पाहिजे. आपल्या व्यापारी वर्गाला शासनाच्या नियमांचे पालन करणे बाबत प्रबोधन केले पाहिजे. पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ठरवली पाहिजे. दररोज व्यापारी वर्गाची, त्यांच्या कामगाराची, थर्मल गन व ऑक्सिमिटरने तपासणी करुनच दुकान सुरु करणे, स्वतःच्या कुटुंबाची पण तपासणी करुन घेणे, लसिकरण करून घेणेबाबत पाठपुरावा करणे, दुकानात येणारे नागरिक नियमाची पूर्तता करतात की नाही हे पाहणे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांस वस्तु न देणे या सारखे नियम केले पाहिजेत. नागरिकांनी पण पुढील काही दिवस अनावश्यक न फिरणे, कोरोनाची लक्षणे दिसल्यास घरच्या घरी उपचार न करता तात्काळ रुग्णालयात तपासणी करणे. तपासणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत स्वतः विलगिकरण राहणे. एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कुटुंबाने तपासणी करून घेणे व आपल्या संपर्कातील इतर व्यक्तिची माहिती देणे, त्यांची स्वाब तपासणी करुन घेणे, कन्टेन्टमेंट झोन, विलगिकरण कालावधीचे १४ अथवा १७ दिवस प्रामाणिक पालन करणे. या गोष्टी स्वयंस्फूर्तीने केल्या पाहिजेत. गेली वर्षभर महसूल, पोलिस, नगर परिषद प्रशासन कोरोना संकटावर मात करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. जेणे करुन मालवणचे जगजीवन, व्यापार सुरळीत होईल. तरी प्रशासनाच्या मानसिकतेचाही विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतल्यास आपण या संकटावर नियंत्रण मिळवू शकतो. थोडक्यात शासनाच्या नियमांचे पालन करूया. कोरोना साखळी तोडण्यात महत्वाचा दुवा बनूया. मालवण शहर कोरोनामुक्त करूया. प्रशासनाला दंड करण्याची संधि न देण्याचा संकल्प सर्वानी करूया, असे आवाहनही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.
