जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष शेखर गाड यांचा आरोप; कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचाही दिला इशारा
*💫मालवण दि.१४-:* लॉकडाऊन काळात दारू व्यावसायिकांना घरपोच सेवा देण्याचा नियम असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम गोवा बनावटीची दारू तसेच महाराष्ट्राची दारू, बियरची बेकायदेशीर विक्री होत असून याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत पोलीस यंत्रणेच्या वरदहस्तामुळेच ही अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघ, सिंधुदुर्गचे अध्यक्ष शेखर गाड यांनी करीत संबंधित दारू अड्ड्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. याबाबत उद्या १५ रोजी पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे तक्रार करून चर्चा केली जाणार असून त्यानंतरही अवैध दारू विक्री बंद न झाल्यास ८ दिवसात आंदोलनाची दिशा ठरवून प्रसंगी जिल्ह्यातील सर्व बार बेमुदत बंद करून शासनाचा निषेध करू असा इशाराही शेखर गाड यांनी दिला आहे. सध्याच्या लॉकडाऊन काळात शासनाने दारू व्यावसायिकांना घरपोच सेवा देण्याची मुभा दिली आहे. त्याप्रमाणे परवाना धारक दारू व्यावसायिक घरपोच दारूची सेवा देत आहेत. असे असताना जिल्ह्यात काही बार मधून खुली दारू विक्री होत आहे. मालवण, चौके, गुरामवाड कट्टा व सुकळवाड परिसरात शासनमान्य बार आणि परमिट रूम आहेत. या परिसरात काही चायनीज दुकाने आहेत ती खुलेआम गोवा दारू आणि आता महाराष्ट्रची दारू, बियर विक्री करत आहेत. सोबत दारू घेणाऱ्यांना चायनीज खाद्याची सोयही केली जात आहे. तर गोवा दारूच्या नावाखाली भेसळयुक्त दारू विकली जात आहे. कट्टा येथील एका बार खाली खुली दारू विक्री होते. गेले १० दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याठिकाणी २ वेळा कारवाई केली. संशयित आरोपीही पकडले. तरी दुसरे दिवशी दारू अड्डे परत चालू असल्याचे चित्र आहे. तेथील पोलीस यंत्रणा डोळेझाक करत आहे. अश्या तक्रारी जिल्हा युनियनकडे आल्या आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या वरदहस्तामुळेच अवैधरित्या दारू विक्री होत आहे. परिणामी परवानाधारकाना व्यवसाय करणं फार अवघड झालं आहे, असे शेखर गाड यांनी म्हटले आहे. जिल्हा युनियनने याची गंभीर दखल घेऊन उद्या दि.१५ मे रोजी पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, आयुक्तसाहेब आणि राज्य उत्पादन शुल्क, अधीक्षक याची भेट घेऊन संपूर्ण कारभाराची तक्रार केली जाणार आहे. तालुकावर पोलीस ठाण्यातही पोलिसांचे लक्ष वेधले जाणार आहे. अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई बाबत पोलीस यंत्रणेने भूमिका स्पष्ट करावी. लक्ष वेधनही संबंधित अवैध दारू विक्री अड्ड्यांवर कारवाई होऊन अवैध दारू बंद न झाल्यास ८ दिवसात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असून प्रसंगी जिल्ह्यातील सर्व बार बेमुदत बंद करून शासनाचा निषेध करणार आहोत, असा इशाराही शेखर गाड यांनी दिला आहे.
