निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनची गटविकास अधिकाऱ्यांजवळ निवेदनाद्वारे मागणी..
⚡सावंतवाडी ता.२५-: निवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्यावतीने मंगळवार २३ डिसेंबर रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात असे नमूद करण्यात आले की, ३० जूनच्या वेतनवाढीचा फरक याच महिन्यात अदा करण्यात यावा. तसेच निवृत्तीनंतर १५ वर्षे पूर्ण झाल्यावर पेंशनवरील कपात थांबवून पूर्ण पेंशन जमा करावी. ८०, ८५ व ९० वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची वेतन वाढ काढणे याशिवाय निवृत्त शिक्षकांचे निवृत्ती उपदान, अंशराशीकरणाची रक्कम तसेच थकीत ग्राम बिलाची अदायगी तातडीने करावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. या मागण्यांबाबत अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चाही झाली. यासाठी संघटनेला पुन्हा चर्चेसाठी बोलावण्यात येऊ नये, तसेच सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी नाईक यांनी
८०, ८५ व ९० वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची निवृत्तीनंतरची वाढ मार्च २०२६ पर्यत पूर्ण करण्यात येईल. स्व. ग्राम बिल, उपदान व अंशिराशिकरण राशी अनुदान आल्यावर लागलीच आदा केले जाईल, असे आश्वासन नाईक यांनी दिले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी जाधव, वरिष्ठ सहाय्यक केरकर यांच्यासह सेवानिवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्ताराम फटनाईक, जिल्हा उपाध्यक्ष ना. य. सावंत, सरचिटणीस रामनाथ राऊळ, रुद्राजी भालेकर, म. ल. देसाई, गुरुनाथ राऊळ आदी उपस्थित होते.
