⚡मालवण ता.२४-:
बेस्ट शिव- हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबई व बेस्ट शिव- हनुमान व्यायामशाळा, कांदळगाव, तालुका मालवण, यांच्यावतीने तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी घेतली जाणारी व मानाची समजली जाणारी ” सिंधुदुर्ग श्री ” ही स्पर्धा यावर्षी कांदळगाव येथे २६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेची सुरुवात कांदळगावचे सुपुत्र व बेस्ट शिव – हनमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. दिनकरराव दौलतराव राणे (सुभेदार ) यांनी तीस वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यायामाचा प्रसार व्हावा या उदात्त हेतूने आपल्या गावात म्हणजेच कांदळगाव येथे ” सिंधुदुर्ग श्री ” ही शरीर सौष्ठव स्पर्धा सुरू केली. हे वर्ष या स्पर्धेचे २५ वे वर्ष असून ही रौप्य महोत्सवी स्पर्धा कांदळगाव येथे घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
कांदळगाव येथील श्री रामेश्वर मंदिर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये या स्पर्धेची रूपरेषा ठरविण्यात आली. याप्रसंगी बेस्ट शिव- हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबईचे अध्यक्ष श्री नंदकुमार राणे, बेस्ट शिव- हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री उमेश कोदे, सेक्रेटरी श्री प्रवीण पारकर, खजिनदार श्री महेश परब सदस्य श्री सत्यवान परब, श्री प्रशांत पारकर, श्री विश्राम राणे, श्री मधुसूदन परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष पारकर, श्री विहार कोदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचा मानकरी “सिंधुदुर्ग श्री” हा किताब मिळविणाऱ्या व्यायामपटूला रोख रुपये २५०००/- आकर्षक चषक, जरीपट्टा व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बेस्ट पोझर व बेस्ट इम्प्रूव्ह यांना प्रत्येकी ५०००/- रुपये आकर्षक चषक व प्रमाणपत्र, प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये ५०००/-, ४०००/-, ३०००/-, २०००/-, १०००/- याप्रमाणे रुपये ७५०००/- ची पारितोषिके, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या रौप्य महोत्सवी स्पर्धेच्या निमित्ताने गेल्या २४ वर्षांमध्ये ज्यांनी ” सिंधुदुर्ग श्री ” हा मानाचा किताब मिळविला त्या सर्व माजी “सिंधुदुर्ग श्री” शरीर सौष्ठवपटूंचा मान्यवरांच्या शुभहस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व शरीरसौष्ठव पटुनी याची नोंद घेऊन या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन बेस्ट शिव – हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबई व बेस्ट शिव- हनुमान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्यावतीने करण्यात येत आहे.
