सायबर क्राईम पोलिस ठाण्याची कारवाई:ऑनलाईन फसवणूक झालेली १२ लाख रक्कम गोठवण्यात सुद्धा यश..
ओरोस ता २४
कणकवली पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात डिजिटल अरेस्ट गुन्हयातील आरोपी सिद्धार्थ कुमार जवाहरलाल गुप्ता, वय 33 याला सिंधुदुर्ग सायबर पोलीसांनी उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर येथून अटक केली आहे. या प्रकरणी १२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली होती.
कणकवली पोलीस ठाण्यात याबाबत ३० नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा तपास कणवकली पोलीस ठाणे करत होते. पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या गुन्हयाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला. या गुन्हयाचा तांत्रिक तपास करुन संशयित आरोपीचा शोध घेण्याकामी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी साबयर पोलीस ठाणेचे तपास पथक नियुक्त केले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ तपास पथक उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपुर येथे रवाना करण्यात आले होते.
नियुक्त तपास पथकाने या गुन्हयातील संशयित सिद्धार्थ कुमार जवाहरलाल गुप्ता, वय ३३ वर्ष, मुळ राहणार गोमरिया, ता. हाटा, जि. कुशीनगर, राज्य उत्तर प्रदेश, सध्या राहणार राम नक्षत्र प्रसाद यांचे घर, पार्वती नगर, झारखंडी मंदिर, कुडाघाट, जि. गोरखपुर, राज्य उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले. आतापर्यंत झालेल्या तपासात अथक प्रयत्न करुन ऑनलाइन फसवणूक झालेली १२ लाख एवढी १०० टक्के रक्कम गोठविण्यात सायबर पोलीसांना यश आले आहे. आता या गुन्हयाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाणे करत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक, नयोमी साटम, कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी या तपास पथकातील अधिकारी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक गणेश क-हाडकर, पोहेकॉ योगेश सातोसे, पोहेकॉ सागर भोसले, पोकों स्वप्निल तोरस्कर सर्व सायबर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे. या तपास पथकास विशेष सहकार्य सपोनि नितीन पुरळकर, मपोकॉ धनश्री परब, पोना फ्रिडन बुथेलो, पोकॉ प्रथमेश गावडे, मपोकों निकीता परब, मपोकों स्नेहल जावकर, पोकॉ ऋषिकेश गुरव, पोकों युवराज भंडारी सर्व सायबर पोलीस ठाणे यांनी केलेले आहे.
फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी: डिजिटल अरेस्ट गुन्हयातील पकडण्यात आलेल्या संशयितासोबत पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे सोबत तपास पथक
