डॉ. अमुल पावसकर यांना पहिला ‘आश्रम पुरस्कार’ जाहीर…

⚡बांदा ता.२४-: सावंतवाडी येथील स्वरूप हॉस्पिटलचे संचालक व सुप्रसिद्ध जनरल सर्जन डॉ. अमुल महादेव पावसकर यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय, सेवाभावी कार्याची दखल घेत श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर (तेलंगणा) आणि बांदा परिवारातर्फे देण्यात येणारा पहिला ‘आश्रम पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल व ग्रंथ असे असून शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता बांदा येथील ‘स्वामी समर्थ हॉल’ येथे होणाऱ्या पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यात डॉ. पावसकर यांना आश्रम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
डॉ. अमुल पावसकर हे एफमास, एफएआयएस, एफआयएजेस पदवीधर असून ते ज्येष्ठ जनरल व मिनिमल ॲक्सेस सर्जन, जीआय एन्डोस्कोपिस्ट तसेच ग्रामीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली एन्डोस्कोपी सुविधा सुरू करणारे शल्यचिकित्सक अशी त्यांची विशेष ओळख आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय संशोधनात्मक उपक्रमांसाठी त्यांना विशेष निमंत्रणे प्राप्त झाली आहेत.
वैद्यकीय क्षेत्राबरोबरच डॉ. पावसकर यांची साहित्यिक व कलावंत म्हणूनही स्वतंत्र ओळख आहे. ते सिंधुदुर्गातील एक प्रसिद्ध कवी असून त्यांचे ‘अमुल्यवाणी’, ‘तरंग’ व ‘मृगजळ’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. आजवर त्यांनी सुमारे १५०० हून अधिक कविता लिहिल्या असून नानिवडेकर साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीत, हार्मोनियम व की-बोर्ड वादन, तत्त्वज्ञान, आत्मचरित्र व आध्यात्मिक साहित्य वाचन तसेच पेन्सिल स्केचिंग या कलांमध्येही त्यांचा विशेष रस आहे.
डॉ. पावसकर यांचे वडील (स्व.) महादेव पावसकर हे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते तसेच ते कवी व लेखकही होते. आई गीता पावसकर या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित होत्या. आई-वडिलांकडून लाभलेला सामाजिक बांधिलकी व लेखनाचा वारसा जपत डॉ. पावसकर यांनी आरोग्यसेवा व साहित्य क्षेत्रात आपली उल्लेखनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. या सर्व सामाजिक, वैद्यकीय व साहित्यिक योगदानाची दखल घेत डॉ. अमुल पावसकर यांना पहिल्या आश्रम पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर (तेलंगणा) आणि बांदा परिवारातर्फे देण्यात आली आहे.
फोटो:-
डॉ अमुल पावसकर.

You cannot copy content of this page