नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले:शहरातील नागरिकांच्या समस्या महायुतीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार..
⚡सावंतवाडी ता.२३-:
“हा विजय माझा नसून सावंतवाडीतील जनतेचा आहे. जनतेने सुरुवातीपासून दिलेला प्रतिसाद व आशीर्वादामुळेच आज मला हा मान मिळाला आहे,” असे प्रतिपादन सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित भाजपच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी आज येथे केले.
त्या म्हणाल्या, “मी या पदाला पूर्णपणे न्याय देत शहरातील नागरिकांच्या समस्या महायुतीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, यासाठी मी व माझी संपूर्ण टीम एकजुटीने काम करणार आहे. शहराच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही. अहोरात्र मेहनत घेऊन सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करू.” असेही त्या म्हणाल्या.
महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष भर देत त्या म्हणाल्या,
“शहरात महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता मी व माझी टीम घेणार आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “दिलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी सर्व नगरसेवक, नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
