महिलांना कायदेशीर हक्कांविषयी सखोल मार्गदर्शन..
⚡कणकवली ता.२३-: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका विधी सेवा समिती कणकवली, वकील संघटना कणकवली तसेच विकास प्रबोधन संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत साळीस्ते येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन समाजातील सर्व घटकांना विशेषतः महिलांना कायदेशीर हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले.
या प्रसंगी कुटुंबीय कायदे, विवाह व त्यासंबंधित कायदे, वारसा हक्क, दत्तक, पालनपोषण, मध्यस्थीकरणाचे महत्त्व, पीडित नुकसान भरपाई योजना, कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, महिलांची सुरक्षा व गोपनीयता, तसेच पोस्को कायदा अशा विविध महत्त्वपूर्ण कायद्यांची माहिती देण्यात आली. यावेळी ॲड. स्वाती तेली, ॲड. पद्मश्री मांजरेकर व ॲड. कौस्तुभ मर्गज यांनी उपस्थितांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विकास प्रबोधन संस्थेच्या अनुया कुलकर्णी व प्रमिला देवरुखकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ग्रामपंचायत साळीस्तेचे सरपंच श्री. प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच श्री. जितेंद्र गुरव, सदस्य सौ. प्रेमलता गुरव, माजी सरपंच सौ. राधाबाई गुरव, तालुका विधी सेवा समिती कणकवली येथील वरिष्ठ लिपिक सौ. आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरास सुमारे 60 महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्यात त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमाबद्दल प्रशासकीय पातळीवर समाधान व्यक्त करण्यात आले असून, अशा उपक्रमांमुळे समाजात कायदेविषयक जागरूकता वाढून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो, असे मत व्यक्त करण्यात आले.
