श्रद्धेची अखंड परंपरा जपणारा श्री देव दोन गावचा पूर्वस जत्रोत्सव उत्साहात साजरा…

सावंतवाडी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावच्या श्रद्धेची अखंड परंपरा जपणारा मळगाव येथील जागृत दैवत श्री देव दोन गावचा पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या लक्षणीय गर्दीत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणेच श्री देव दोन गावचा पूर्वस हे मळगाव व सोनुर्ली या दोन्ही गावांचे आराध्य दैवत आहे. परंपरेनुसार श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवावेळी मळगाव पंचायतनची तरंगकाठी व पालखी सोनुर्ली येथे माऊलीच्या दर्शनासाठी जाते, तर श्री देव दोन गावचा पूर्वस यांच्या जत्रोत्सवाच्या दिवशी श्री देवी माऊलीची पालखी वाजत-गाजत मळगाव येथे आगमन करते. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवावेळी काही कारणास्तव ओटी भरणे राहिले असल्यास, दोन गावचा पूर्वस जत्रोत्सवादिवशी माऊलीची ओटी भरून भाविक नवसफेड करतात. अशा या दोन गावांतील श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाचे प्रतीक असलेला हा जत्रोत्सव काल भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. या जत्रोत्सवानिमित्त सकाळी मंदिरात धार्मिक विधी, विधिवत पूजा, श्री देव दोन गावचा पूर्वस देवावर अभिषेक तसेच दोन्ही गावच्या ब्राम्हणांच्या साक्षीने एकादशमी विधी पार पडले. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी श्री देवी माऊलीचे वाजत-गाजत आगमन झाल्यानंतर माऊलीची ओटी भरणे, श्री देव दोन गावचा पूर्वस देवाला केळी-नारळ अर्पण करणे, नवस बोलणे व फेडणे आदी विधी भक्तीभावाने पार पडले. रात्री ११.३० वाजता मंदिराभोवती तरंगकाठीसह भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर खानोली येथील खानोलकर दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेला “गोकर्ण महाबळेश्वर” हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगाला नाट्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सकाळी दहीकाला झाल्यावर जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली. या जत्रोत्सवाला सोनुर्ली, मळगावसह वेत्ये, निरवडे, कोनापाल, माजगाव, इन्सुली, न्हावेली, नेमळे आदी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री देव दोन गावचा पूर्वस व श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले.

You cannot copy content of this page