⚡ सावंतवाडी ता.१४-:
युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या पुढाकारामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील दीर्घकालीन पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक आमदार विकास निधीतून मंजूर झालेल्या विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ आज उपजिल्हा रुग्णालय परिसरात करण्यात आला.
मार्च, एप्रिल व मे या उन्हाळी महिन्यांत रुग्णालयात तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना तसेच रुग्णालय कर्मचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य देव्या सूर्याजी व रवी जाधव यांना पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.
त्यानुसार देव्या सूर्याजी यांनी स्थानिक आमदार विकास निधीतून विंधन विहिरीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्या प्रयत्नांना यश येत आज विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ झाला. या विंधन विहिरीमुळे येत्या काळात रुग्णालयातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, रुग्णालय कर्मचारी, रुग्ण तसेच सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी देव्या सूर्याजी यांचे आभार मानले.
यावेळी देव्या सूर्याजी, रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे, बोरवेलचे मालक रुपेश माणगावकर तसेच रुग्णालयातील कर्मचारी सर्वेश घाडी आदी उपस्थित होते.
