तोडफोडीबाबत तक्रार करणार नाही – डॉ. अनंत नागवेकर..
कणकवली : नातेवाईकांचा तीव्र संताप, रूग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांना मारहाणीचा प्रयत्न आणि प्रचंड पोलीस फौजफाटा यामुळे कणकवलीतील त्या रूणालयातील वातावरण प्रचंड तंग झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी मोबाईलवरून मृत युवतीच्या नातेवाईकांशी मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर रूग्णालय परिसरातील तणाव निवळला.
दरम्यान युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर युवतीच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.
दरम्यान आजच्या घटनेत शहरातील डॉ. नागवेकर यांच्या रूग्णालयाची तोडफोड झाल्याने दर्शनी भागाचे, छताचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या तोडफोडीबाबत आपण पोलिसांत तक्रार दाखल करणार नाही. रूग्णाच्या मृत्यूबाबत आम्हीही शोकमग्न आहोत अशी भूमिका डॉ. अनंत नागवेकर यांनी मांडली.
कणकवली तालुक्यातील तरळे येथील कस्तुरी चंद्रकांत पाताडे (वय १९) हीच्या मानेच्या वरील भागाला गाठ आल्याने तिला डॉ. नागवेकर यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला कोल्हापूर येथील ॲस्टर आधार रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तिचा मध्यरात्री दीड च्या सुमारास मृत्यू झाला. यानंतर तिचा मृतदेह कणकवलीतील डॉ. नागवेकर यांच्या रूग्णालयात दुपारी ११ वा. च्या. सुमारास आणण्यात आला. त्यानंतर हळूहळू रूग्णाचे नातेवाईक, राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले आणि कणकवलीत दुपारी ३ वाजेपर्यंत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
