अध्यक्षा सौ सावंत यांचे जलव्यवस्थापन सभेत आदेश
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विंधनविहिरी खोदाईचे काम केले जात असल्याने पाण्याची पातळी घटत चालली आहे. घटत चाललेली पाण्याची पातळी वाढावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात यावी असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी बुधवारी जलव्यवस्थापन समिती सभेत दिले जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती महेंद्र चव्हाण, अंकुश जाधव, शर्वाणी गांवकर, सदस्य मायकल डिसोजा, श्वेता कोरगावकर, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विंधन विहिरींची खोदाई केली जाते. पाण्याचा भरमसाट उपसा केला जातो. त्याचा परिणाम भूगर्भातील पाण्याच्या पातळीवर होत आहे. तरी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्यात यावी. यासाठी १५ वित्त आयोगाने तरतूद करण्यात यावी याबाबत सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात त्याचे नियोजन करावे असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत सभेत सभेत दिले. जलसंधारणाच्या कामांचा आराखडा जल व्यवस्थापन समिती समोर मंजुरीला न ठेवतात परस्पर जिल्हा नियोजन कडे पाठविला गेल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी चुचविलेली महत्त्वाची कामे वगळण्यात आली आहेत असा आरोप करत जलसंधारण चा वार्षिक कृती आराखडा परस्पर जिल्हा नियोजन कडे कसा गेला ? असा प्रश्न उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत उपस्थित केला. यावर कोणत्याही कामाची यादी अथवा आराखड्याची यादी जल व्यवस्थापन समिती सभेत ठेवल्याशिवाय परस्पर मंजुरीसाठी जिल्हा नियोजन कडे पाठवू नये असा ठराव घेण्यात आला.
