कसाल शिक्षण संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* कसाल शिक्षण संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत कसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना मोफत नाश्त्याची व्यवस्था केली आहे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रणी असणारी धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते.या संस्थेचे विश्वस्त आणि अनेक शिक्षक जिल्ह्याच्या विविध सामाजिक चळवळीचे आधारस्तंभ आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना साथीच्या काळात जनतेला आवश्यक ती मदत करण्याची तयारी संस्थेने सुरू केलेली आहे. कसाल प्राथमिक आरोग्य केंद्रावर या दशक्रोशीतील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाते. सद्य स्थितीत लसींचा असलेला तुटवडा लक्षात घेता,दशक्रोशीतील नागरिक सकाळी पाच सहा वाजल्यापासून आरोग्य केंद्रासमोर रांगा लावतात. परिणामी लस मिळण्याची वेळ येईपर्यंत ते उपाशीपोटी असतात,लॉक डाऊन असल्याने लोकांच्या चहा नाश्त्याची इतरत्र व्यवस्था होणे शक्य नाही,अश्या परिस्थितीत त्यांना किमान चहा,नाश्ता मिळावा म्हणून शिक्षण संस्थेने पुढाकार घेतलेला असून, विश्वस्त, शिक्षकवृंद यांच्या आर्थिक सहयोगातून ही सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. आज या सेवेचा शुभारंभ संस्थाध्यक्ष भाई सावंत संस्थेचे माजी अध्यक्ष,तथा विश्वस्त प्रभाकर सावंत, सचिव यशवंत परब,माजी सचिव,तथा विश्वस्त अवधूत मालणकर,कसाल हायस्कुलचे मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर सर,वैद्यकीय अधिकारी डॉ सौ राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रभाकर सावंत म्हणाले की हा काळ सर्वांच्याच कसोटीचा काळ आहे.’खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेची प्रचिती आपण घेतली पाहिजे.या काळात व्यक्ती असो वा संस्था,गरीब असो वा श्रीमंत, सर्वांनीच आपलं सामाजिक बांधिलकीचे कार्यक्षेत्र व्यापक केलं पाहिजे.मन विशाल केलं पाहिजे.तरच या संकटातून,या धक्क्यातून आपण लवकर बाहेर पडू शकतो.
