‌*चक्रीवादळापासून संरक्षण होण्यासाठी हार्डवेअर व कपड्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या

*जिल्हा व्यापारी महासंघाची पत्राद्वारे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी*

मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर १६ मे रोजी चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला असल्याने सर्वसामान्यजनतेच्या मालमत्तेचे चक्रिवादळा पासुन संरक्षण करण्याच्या दृष्टीने तांतडीने निर्णय घेऊन अशा वस्तूं व साहित्याची विक्री करणारी हार्डवेअर व कपड्याची दुकाने ‘काही बंधने घालून मर्यादीत वेळे पुरती का होईना’ पण सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती ईमेल पत्रा द्वारे जिल्हा व्यापारी महासंघांच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे करण्यात आली आहे. सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर १६ मे रोजी चक्रिवादळाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हावासियांच्या मनात आपल्या घरे, मांगरांच्या शाकारणीची चिंता भेडसावू लागली आहे. संपुर्ण जिल्ह्यात लागू टाळेबंदी अंतर्गत सर्वच दुकाने बंद असल्याने शाकारणी किंवा सांभाव्य चक्रिवादळा पासुन आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ‘पत्रे, दोरी, प्लास्टिक कापड किंवा अन्य आवश्यक साहित्य’ मिळणे दुरापास्त झाले आहे. या वस्तूं उपलब्ध करून देण्यासाठी ग्राहकांचा दबाव संबंधित दुकानदारांवर वाढत आहे. मात्र टाळेबंदीच्या काटेकोर अंमलबजावणी मुळे व्यापारीही दुकान उघडण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे ही दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी,अशी मागणी मेल निवेदन पत्राद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने कार्यवाह नितीन वाळके यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page