*जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक
देवगडःप्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हयामधील नगर भुमापन झालेल्या २३ गावांमध्ये मालमत्ता पत्रकाचे काम (प्रॉपर्टी कार्ड )ऑनलाईन संगणकिकृत १०० टक्के काम जिल्हाभुमी अधिक्षक कार्यालयाने व तालुका उपभुमी अभिलेख कार्यालयाने पुर्ण करुन राज्यामध्ये मालमत्ता पत्रकाचे काम (प्रॉपर्टी कार्ड )पुर्ण करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा हा अग्रेसर जिल्हा ठरला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा भुमीअभिलेख कार्यालयाचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे. नगरभुमापन झालेल्या क्षेत्रामधील मालमत्ता पत्रकाचे काम (प्रॉपर्टी कार्ड ) जिल्हयामधील २३ गावांमध्ये झाले असून यामध्ये ४३२१७ मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड ) तयार करण्यात आली आहेत. प्रॉपर्टी कार्ड डिजिटल सिग्नेचर करुन महाभुमी संकेतस्थळावर अपलोड करुन हे काम सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये आता १०० टक्के पुर्ण झाले आहे. देवगड तालुक्यामधील तीन गावांमधील ४८९५ मिळकत पत्रकांची संख्या असून या सर्वांचे मालमत्ता पत्रक(प्रॉपर्टी कार्ड ) संगणकिकृताचे काम पुर्ण झाले आहे. तसेच कणकवलीमधून चार गावांमधून ७०३८, मालवणमधील दोन गावांमधील ६११५, वेंगुर्ला चार गावांमध्ये ४५८४, कुडाळ तीन गावांमधील ५७८१, सावंतवाडी सात गावांमधील १४८०४ अश्या २३ गावांमधील ४३२१७ जमीन धारकांची प्रॉपर्टीकार्ड संगणकिकृताचे काम पुर्ण करण्यात आले आहे. राज्यामध्ये मालमत्ता पत्रकाचे (प्रॉपर्टी कार्ड ) काम संगणकिकृत ऑनलाईन १०० टक्के पुर्ण करणारा सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर ठरला आहे. जिल्हा भुमी अधिक्षक डॉ.विजय विर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये मालमत्ता पत्रकाचे (प्रॉपर्टी कार्ड ) काम १०० टक्के पुर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला वेळेचे व नियोजनाचे बंधन देण्यात आले होते. स्वतः जिल्हा भुमीअधिक्षक डॉ.विर यांनी विशेष लक्ष देवून सदर मालमत्ता पत्रकचे (प्रॉपर्टी कार्ड ) काम पुर्ण केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र मध्ये १०० टक्के काम करणारा अग्रेसर जिल्हा ठरला आहे. सदर मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड ) चे काम १०० टक्के पुर्ण करण्यासाठी जिल्हा भुमीअधिक्षक डॉ.विजय विर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक प्रियदा सापोरे, वेंगुर्ला -कणकवली-मालवणचे भुमी उपअधिक्षक डॉ.सौरभ तुपकर, सुवारे, संजय पारटे, रोशनी मटकर, तनुश्री खोत,भालचंद्र सावंत, अभिषेक देसाई, शेखर पवार, प्रदीप खोत, प्रमोद भिसे, राहुल गायकवाड या भुमी अभिलेखच्या अधिकारी व कर्मचा-यांनी विशेष मेहनत घेतली आहे. मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड)च्या ऑनलाईन कार्यवाही १ एप्रिल २०२१ पासुन सुरु करण्यात आली होती. अल्पावधीतच सदरचे काम लॉकडाउनच्या काळामध्ये सदर वेळेचा उपयोग करुन हे काम पुर्ण करण्यात आले आहे.
