वेंगुर्ला पं. स. सभेत नितीन मांजरेकर यांनी मांडला महत्त्वपूर्ण ठराव
वेंगुर्ला
शासनाच्या पाटबंधारे विभागामार्फत दि. 10 जुलै 2026 पासून वेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेवीर येथे असलेल्या विस्तीर्ण धरणातून तातडीने काम हाती घेऊन नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाद्वारे वेंगुर्ला तालुक्यातील आडेली, कामळेविर, झाराप कामळेवीर, नजिकच्या गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. परंतु उन्हाळी कालावधीत धरणात पुरेसा पाण्याचा साठा व्हावा, पाणी पातळीत योग्य प्रकारे वाढ व्हावी व नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यादृष्टीने शासनाने योग्य नियोजन करावे, असा महत्वपूर्ण ठराव आडेली पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनी आज (दि. 17 जुलै ) झालेल्या वेंगुर्ला पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडला. वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा आज शुक्रवारी पंचायत समितीच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, तसेच रेडी पं. स. सदस्य प्रियांका घाटवळ, आडेली पं.स. सदस्य नितीन मांजरेकर, आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी, वायंगणी पं. स. सदस्या शितल राऊत, उभादांडा पं. स. सदस्या साक्षी नार्वेकर, तुळस पं. स. सदस्या सुचिता वजराटकर, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. सभापती शंकर घारे यांनी वीज समस्यासह अन्य बाबतीत अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच उपसभापती सचिन देसाई यांनी विविध प्रश्नाबाबत सूचना मांडल्या. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर “आक्रमक भूमिका” घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना देत तातडीचे कार्यवाहीचे आदेश दिले.
यावेळी अन्य उपस्थित सदस्यांनीही विविध सूचना मांडल्या. शनिवार दि.18 जुलै रोजी सकाळी डेरवण येथील रुग्णालयामार्फत भव्य आरोग्य शिबिर वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसभापती सचिन देसाई यांनी केले. पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी मतदारसंघात बॅ. नाथ पै सभागृह येथे 22 जुलै रोजी दुपारी 2.30 वा. महसूल विभागामार्फत महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले, अशी माहिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी दिली.
