सह्याद्री ऍडव्हेंचर गृपची तत्परता
कुडाळ : आंबोली येथील नांगरतासवाडी परिसरात भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकल्याची थरारक घटना घडली. मात्र, माहिती मिळताच ‘सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगेलीच्या पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत या चारही जणांना आज दुपारी सुखरूप बाहेर काढले.
नांगरतासवाडी इथं चार शेतकरी शेतात भात लावणीचे काम करत होते. दरम्यान, अचानक पाण्याचा प्रवाह आणि पातळी वाढल्यामुळे हे चारही जण त्यातून बाहेर पडू शकले नाहीत आणि पुरात अडकले. ही माहिती मिळताच, आपत्कालीन परिस्थितीत सदैव तत्पर असणाऱ्या ‘सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप’चे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेस्क्यू टीममधील उत्तम नार्वेकर, सुजित चुलियान आणि मायकल डिसोजा यांनी जीवाची पर्वा न करता थेट पाण्याच्या वेगवान प्रवाहात उडी घेतली. या तिघांनी अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने पाण्यात अडकलेल्या चारही जणांपर्यंत पोहोचून त्यांना एक-एक करून सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढले. यात दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश होता. शुक्रवारी (दि. 17/07/2026) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू ग्रुपने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे चार जणांचे प्राण वाचले असून, परिसरातून रेस्क्यू टीममधील जवानांचे आणि संपूर्ण ग्रुपचे कौतुक होत आहे.
