*भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली भीती*
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शासनाने यावर अतिजलद उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही, असे भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. मालवण तालुक्यातील कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना तात्काळ राबविणे गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे आरोग्य उपकेंद्रात देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुविधा तात्काळ सुरू करण्यात यावी. उपकेंद्रात जर सुविधा उपलब्ध झाली तर गर्दी कमी होईल, लोकाचे हाल कमी होतील आणि लांबून येणाऱ्या लोकांचे पैसे सुद्धा वाचतील, असे चिंदरकर यांनी म्हटले आहे. जदलगतीने रुग्णांची तपासणी होण्यासाठी रॅपिड टेस्टींग कीट आरोग्य उपकेंद्रात उपलब्ध होणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णवाहिकेंना तात्काळ डिझेलची सुविधा मिळावी. तसेच कोव्हीड काळात गावात कार्यरत असलेल्या ग्रामनियंत्रण समितीला विमा संरक्षण तात्काळ कोव्हीड लसीकरण प्राधान्याप्रमाणे मिळावे. तर आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांना कोव्हीड कालावधीसाठी अतिरीक मानधन मिळावे, अशी मागणीही चिंदरकर यांनी केली आहे.
