ओंकार हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा…

साईप्रसाद काणेकर: अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडल..

बांदा/प्रतिनिधी
बांदा परिसरात फिरत असलेल्या ओंकार हत्तीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून, वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात संताप उसळला आहे. ओंकार हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करा, त्याला त्रास देणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीवर कठोर कारवाई करा! अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) चे बांदा शहर प्रमुख तसेच ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी दिला आहे.
काणेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “वनविभागाचे अधिकारी फक्त पाहत बसले आहेत, पण ओंकार हत्तीला ना संरक्षण मिळतंय, ना शेतकऱ्यांना न्याय!” ओंकार हत्ती सध्या बांदा, इन्सुली व वाफोली परिसरात सतत वावरत असून, त्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हत्तीच्या अंगावर सुतळी बॉम्ब फेकण्याचे निर्घृण प्रकार सुरू असल्याचं समोर आलं असून, हे वन्यजीवांवरील अत्याचाराचे गंभीर उदाहरण असल्याचं काणेकर यांनी ठणकावून सांगितलं. “हा प्रकार मानवतेला काळिमा फासणारा आहे. यामागील दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे!” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, हत्तीमुळे नुकसान झालेल्या भातशेती व बागायतींचे पंचनामे अद्याप करण्यात आलेले नाहीत, ही बाब गंभीर असल्याचं नमूद करून काणेकर म्हणाले, “शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या! अन्यथा वनविभागाच्या दारात जनता मोर्चा घेऊन उभी राहील!”
काणेकर यांनी पुढे चेतावणी दिली की, “ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे परत पाठवणे ही वनविभागाची जबाबदारी आहे. आता शब्द नको तर प्रत्यक्ष कृती हवी!”

You cannot copy content of this page