ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा…

गुरुदास गवंडे: सावंतवाडी उपवनसंरक्षण यांचे निवेदनद्वारे वेदले लक्ष..

⚡बांदा ता.०६-: सावंतवाडी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून संचार करणाऱ्या प्रसिद्ध वन्यजीव हत्ती ओंकार याच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दांड्याने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी निगुडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी सावंतवाडीचे उपवनसंरक्षक यांना निवेदन देऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, ओंकार हत्ती गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात विविध भागांत संचार करत आहे, परंतु त्याने आजवर कोणतीही जीवितहानी किंवा त्रास दिलेला नाही. शांत स्वभावाच्या या हत्तीवर मारहाण करणे ही अमानुष आणि वन्यजीव संरक्षण कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणारी घटना आहे.” तसेच गवंडे यांनी मागणी केली आहे की, व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर या घटनेच्या ठिकाणी उपस्थित असणारे वन कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी व दोषींवरही कारवाई करावी.
“या घटनेवर कारवाई न झाल्यास दशक्रोशीतून तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील,” असा इशारा गवंडे यांनी दिला आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींकडून ओंकार हत्तीच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. वनविभागाने यावर तातडीने कारवाई करून दोषींना अटक करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे.

You cannot copy content of this page