मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या युवकांना ‘वाचनाचा दिवा’…

सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांची तरुणाईला आगळीवेगळी दिवाळी भेट..

⚡सावंतवाडी ता.२५-: मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला वाचनाची गोडी लागावी, या हेतूने सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना दिवाळी अंक भेट देण्यात आले.

दिवाळी सुट्टीत युवक आणि विद्यार्थ्यांनी वेळ मोबाईलवर वाया न घालवता दर्जेदार साहित्य वाचावे, या उद्देशाने ही उपक्रमात्मक भेट देण्यात आली. गावडे म्हणाले, “मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने वाचन संस्कृती हरवू लागली आहे. दिवाळी अंकांमधील प्रेरणादायी लेख, कथा आणि माहिती वाचल्यास युवा पिढीला योग्य दिशा मिळेल.”

आजच्या इंटरनेट युगात युवक सहज चुकीच्या आकर्षणात अडकताना दिसतात. अशा काळात वाचन हीच त्यांची खरी ढाल आहे. दिवाळी अंकांच्या माध्यमातून ज्ञान, संस्कार आणि विचारांची श्रीमंती मिळावी, हा या उपक्रमामागचा प्रमुख हेतू असल्याचे गावडे यांनी सांगितले.

या आगळ्या-वेगळ्या दिवाळी भेटीमुळे अनेक तरुणांच्या हातात मोबाईलऐवजी आता दिवाळी अंकांचे पानं उलटताना दिसत आहेत, वाचन संस्कृतीला नवा उजाळा देणारा हा उपक्रम ठरत आहे.

You cannot copy content of this page